शिवरायांचा पुतळा पंचधातुचा नाही; राजकोट किल्ल्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार, वैभव नाईकांचा गंभीर आरोप
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: August 27, 2024 07:29 PM2024-08-27T19:29:36+5:302024-08-27T19:31:18+5:30
महाविकास आघाडी व जनतेच्यावतीने उद्या तहसिल कार्यालयावर मोर्चा
कणकवली : मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कामात भ्रष्टाचार झाला आहे. पालकमंत्र्यांनी बगलबच्छा कार्यकर्त्यांना पोसण्यासाठी या एवढ्या मोठ्या कामाची ६ मजुर संस्थांना २५ - २५ लाखांची कामे दिली. त्याच धर्तीवर आपटे नामक ठेकेदाराला अनुभव नसताना काम दिले. उभारण्यात आलेला छत्रपतींचा पुतळा हा पंचधातूचा नाही. हे कोसळल्यामुळे काल सिध्द झाले आहे. कामात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे या घटनेची जबाबदारी स्वीकारुन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ठाकरे शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी केली. कणकवली येथील विजय भवन येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याबाबत नौदल विभागाची तक्रार करण्यात आली आहे. जे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एकाच रजिस्टरला नोंदवण्यात आले आहे. पुतळा पडणार याची कल्पना बांधकाम विभागाला आल्याने त्यांनी पत्र दिले होते. घटनेला सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.
राणे कुटुंबियांची तोंडे कुणी बांधली ?
राज्याच्या विविध प्रश्नांवर तोंड काढून बोलणारे राणे कुटुंबिय या विषयावर गप्प आहेत, आता त्यांची तोंडे कुणी बांधली आहेत का? असा सवाल वैभव नाईक यांनी केला. सार्वजनिक बांधकाम मंत्री जोपर्यंत राजीनामा देत नाहीत. तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
उद्या आक्रोश मोर्चा
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी महाविकास आघाडी व जनतेच्यावतीने उद्या, बुधावारी (दि २८) तहसिल कार्यालयावर मोर्चा काढणार येणार. मालवण भरड नाका येथून हा आक्रोश मोर्चा निघणार आहे. या मोर्चात जनता सहभागी होईल असेही नाईक यांनी सांगितले.
मंत्री केसरकरांचे वक्तव्य अशोभनीय
मंत्री दीपक केसरकर यांनी केलेलं वक्तव्य अशोभनीय आहे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज ही आमची अस्मिता आहे. अश्या घटनांमध्ये माझ्यावर गुन्हा दाखल झाल्यास भिक घालणार नाही. या दूर्घटनेला बांधकाम खातेच जबाबदार आहे,त्यामुळे आम्ही ते कार्यालय फोडले असल्याचे वैभव नाईक यांनी सांगितले.