शिवाजी महाराज पुतळा स्थलांतरण: संदेश पारकरांनी बालिश विधाने थांबवावीत, नगराध्यक्ष समीर नलावडेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 04:52 PM2022-07-11T16:52:42+5:302022-07-11T16:54:46+5:30

मुख्यमंत्री, पालकमंत्री हे त्यांचे असतानाही मागील अडीच वर्षे छत्रपतींचा पुतळा पारकर व त्यांचे सहकारी स्थलांतर करू शकले नाहीत. मात्र, ते काम कणकवली नगरपंचायत प्रशासनाने करून दाखवले.

Shivaji Maharaj statue relocation: Sandesh Parkar should stop childish statements says Mayor Sameer Nalavade | शिवाजी महाराज पुतळा स्थलांतरण: संदेश पारकरांनी बालिश विधाने थांबवावीत, नगराध्यक्ष समीर नलावडेंचा टोला

छाया - समीर नलावडे

googlenewsNext

कणकवलीकणकवलीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा स्थलांतरणाच्या पार्श्वभूमीवर आमच्यावर विनाकारण आरोप करणाऱ्या संदेश पारकर यांचा पूर्वीचा इतिहास मला चांगलाच माहित आहे. त्यामुळे त्यांनी तोंड उघडायला लावू नये. तसेच दरोडे कोणी घातलेत आणि व्यापाऱ्यांना भर बाजारपेठेत मारहाण कोणी केली ? हे कणकवलीतील जनतेला माहिती आहे. त्यामुळे पारकर यांनी आता बालिश वक्तव्य करणे थांबवावे असा टोला कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी लगावला.

कणकवली नगरपंचायत कार्यालयातील नगराध्यक्ष दालनात आज, सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, बांधकाम सभापती ऍड. विराज भोसले, आरोग्य सभापती तथा गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक अभिजित मुसळे, महेश सावंत, राजू गवाणकर आदी उपस्थित होते.

नलावडे म्हणाले, कणकवली नगरपंचायत प्रशासनाने विधिवत पूजा करून शिवाजी महाराजांचा पुतळा सुरक्षितपणे नगरपंचायत सभागृहात ठेवलेला आहे. पहाटे ब्रम्हमुहूर्तावर छञपतींचा पुतळा सन्मानाने व सुरक्षित ठिकाणी आणून ठेवलेला आहे. त्यामुळे पारकर यांनी त्याची काळजी करू नये.
त्याचप्रमाणे अवैध धंद्यात कोण पुढे असते हे जनतेला माहीत आहे. शहरात नियोजनबद्धपणे विकास काय असतो हे आम्ही दाखवून दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दैवत होते. मात्र, त्यांच्या शिवसेनेतीलच एक व्यक्ती शिवरायांच्या पुतळा स्थलांतरणाला विरोध करत आहे. याला काय म्हणावे? एकप्रकारे बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला हा विरोध असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

..अन् सरकार गडगडले

शिंदे गटाने बंड करण्याआधी सकाळी पारकर यांनी उद्धव ठाकरेंच्या हातात हात देत हस्तांदोलन केले आणि संध्याकाळी त्यांचे सरकार गडगडले. अपशकुनी पारकरांच्या विरोधात कणकवलीकरांनी मला बहुमताने नगराध्यक्षपदी निवडून दिले आहे. मुख्यमंत्री, पालकमंत्री हे त्यांचे असतानाही मागील अडीच वर्षे छत्रपतींचा पुतळा पारकर व त्यांचे सहकारी स्थलांतर करू शकले नाहीत. मात्र, ते काम कणकवली नगरपंचायत प्रशासनाने करून दाखवले. त्यामुळे पारकर यांनी पुतळा स्थलांतरणाबाबत न्यायालयात किंवा आणखी कुठेही जावे. तो त्यांचा प्रश्न आहे. मात्र, विनाकारण आरोप थांबवावे. तसेच पुतळा स्थलांतरणाबाबत प्रशासनाकडे साधा अर्ज केला तरी सगळी माहिती पारकर यांना मिळेल. असेही नलावडे म्हणाले.

Web Title: Shivaji Maharaj statue relocation: Sandesh Parkar should stop childish statements says Mayor Sameer Nalavade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.