आचरा संस्थानात रंगला शिवलग्न सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 05:28 PM2017-10-02T17:28:25+5:302017-10-02T17:28:25+5:30
ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या आचरा येथील संस्थानी थाटासाठी प्रसिद्ध असणाºया इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या दसरोत्सवाची शाही थाटात सांगता झाली.
आचरा : ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या आचरा येथील संस्थानी थाटासाठी प्रसिद्ध असणाºया इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या दसरोत्सवाची शाही थाटात सांगता झाली.
शनिवारी सायंकाळी तोफांच्या व बंदुकीच्या आतषबाजीनंतर श्री देव रामेश्वराचे तरंग महालदार, चोपदार, अबदागीर, निशाण व बारा-पाच मानकरी यांच्या शाही लवाजम्यासह फुरसाई मंदिर येथे शिवलग्न कार्यक्रमासाठी गेले. शिवलग्न कार्यक्रम पार पडल्यानंतर हजारो भाविकांनी सोन्याचे प्रतीक मानलेल्या आपट्याची पाने सोने म्हणून लुटली.
श्री देव रामेश्वराच्या शाही दसरोत्सवास मुंबई, कराड, गोवा, बेळगाव, पुणे, गोकर्ण येथून आचरा गावचे मूळ रहिवासी दाखल झाले होते. श्री देव रामेश्वराची पिंडी यावेळी पंचमुखी महादेवाच्या रुपात सजविण्यात आली होती. हे अनोखे श्रींचे रुप पाहण्याचा दुर्मीळ आनंद लुटण्यासाठी रामेश्वर मंदिरात भक्तांची रिघ लागली होती.
आचरा गावच्या माहेरवाशिणी फुरसाई देवीची खणानारळाने ओटी भरण्यास दाखल झाल्या होत्या. सकाळपासून श्री देव रामेश्वराचे दर्शन घेऊन माहेरवाशिणी श्री देवी फुरसाई मंदिराकडे ओटी भरण्यासाठी जात होत्या. दसरोत्सवाच्या कार्यक्रमास हजारो भाविकांनी लक्षणीय उपस्थिती दर्शविली होती.