पालपेणे शाळेत साकारतेय शिवचरित्र
By admin | Published: January 22, 2015 11:34 PM2015-01-22T23:34:13+5:302015-01-23T00:44:35+5:30
अनोखा उपक्रम : छत्रपतींचा इतिहास भिंतीवर जिवंत झाला
मंदार गोयथळे - असगोली -हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, छत्रपती शिवरायांचा इतिहास हळूहळू लोप पावण्याची भीती निर्माण झाली असताना, गुहागर तालुक्यातील पालपेणेसारख्या एका गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने विद्यार्थ्यांसाठी आपल्या इमारतीवरील भिंतीवर शिव छत्रपतींचे चरित्रचित्र साकारण्याचा विडा उचलला आहे.
शृंगारतळी बायपास आरजीपीपीएल प्रकल्प मार्गावर, विस्तारलेल्या जागेमध्ये पालपेणे शाळा नं. २ची देखणी वास्तू सर्वांचे लक्ष वेधून घेताना पाहायला मिळते. या शाळेमधील मूळ चित्रकार असलेले पदवीधर शिक्षक राजू जानू सुर्वे यांनी शाळेमधील सुस्थितीत असलेली वर्गव्यवस्था व परिसर लक्षात घेऊन, मुख्याध्यापक मनोहर पवार यांच्यासमोर जुलै २०१४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा चित्ररुप शिवचरित्राच्या रुपाने उभारण्याची कल्पना मांडली. त्याला मुख्याध्यापकांनी तत्काळ होकार देत, हा विषय शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रघुनाथ घाणेकर व सर्व समितीसमोर ठेवून त्याला मंजूरी घेतली. हे चित्ररुप शिवचरित्र साकारण्याचा उद्देश समितीच्या सदस्यांसमोर स्पष्ट झाल्यावर, यासाठी अपेक्षित असणारा हजारो रुपयांचा निधी अनेकांनी भरसभेत देण्याचे मान्य केले. त्यामध्ये शाळेतील विद्यार्थी व शिक्षकही मागे राहिले नाहीत. त्यांनीही या कामासाठी आपल्याकडील हजारो रुपयांची देणगी शाळेकडे जमा केली. अशा प्रकारे आपल्या शाळेत शिवचरित्र साकारतेय ही संकल्पना हळूहळू गावामध्ये समजल्यावर विद्यार्थ्यांचे पालक व ग्रामस्थांमधूनही शेकडो रुपयांची देणगी शाळेमध्ये जमा झाली. हे शिवचरित्र उभारण्यासाठी आवश्यक असलेली सुरुवातीची ठराविक रक्कम जमा झाल्यानंतर, डिसेंबर २०१४ पासून ही संकल्पना प्रत्यक्ष साकारण्याचे शाळेने निश्चित केले. यासाठी शाळेचे पदवीधर शिक्षक व चित्रकार सुर्वे यांनी पालपेणे गावातील स्थानिक चित्रकार भालचंद्र घाणेकर तसेच दापोलीमधील आपले चित्रकार मित्र प्रशांत कांबरे, प्रवीण वेळणस्कर व मंदार उजाळ यांच्याशी याविषयी बोलणे करुन, त्यांना द्यायचा मेहनताना निश्चित करुन कामाला सुरुवात केली. अशा प्रकारे गेल्या २०-२५ दिवसांत या सर्व चित्रकार मंडळींनी सुरुवातीला रस्त्यावरुन शाळेच्या २५ फुटाच्या मोठ्या भिंतीवर, १२ फूट उंचीचे छत्रपती शिवाजी महाराजांचे जिवंतपणा असलेले चित्र साकारले. चित्र साकारण्याचे काम गुहागर व दापोलीमधील पाच चित्रकारांनी केले. यामधील सर्वांत लहान आकाराचे चित्र साकारण्यासाठी एक दिवस व रात्र एवढा वेळ, तर सर्वांत मोठे चित्र साकारण्यासाठी सुमारे चार ते पाच दिवस लागल्याचे यावेळी चित्रकार सुर्वे यांनी सांगितले.
यासाठी मुख्याध्यापक पवार, शिक्षक सुर्वे, पदवीधर शिक्षक मेघा पवार, वैशाली गुरव, उपशिक्षक दीपक साबळे, अश्विनी नरखेडकर यांनी सर्वतोपरी सहकार्य केले.