महाशिवरात्रोत्सवात साडेतीन हजार नारळांचे शिवलिंग लक्षवेधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 12:24 PM2020-02-22T12:24:41+5:302020-02-22T12:27:44+5:30
कुडाळ : प्रजापिता ब्रम्हकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय कुडाळ आयोजित महाशिवरात्रोत्सव महोत्सवात सुमारे ३ हजार ५०० नारळांचा वापर करून बनविण्यात आलेल्या ...
कुडाळ : प्रजापिता ब्रम्हकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय कुडाळ आयोजित महाशिवरात्रोत्सव महोत्सवात सुमारे ३ हजार ५०० नारळांचा वापर करून बनविण्यात आलेल्या १२ फुटी नारळाचे शिवलिंग खास आकर्षण ठरत आहे. हे शिवलिंग पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.
रविवारपासून कुडाळ पोस्ट कार्यालयासमोरील पटांगणात महाशिवरात्रोत्सवाचा प्रारंभ झाला. २२ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित देसाई व कुडाळचे नगराध्यक्ष ओंकार तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी माजी सभापती अॅड. विवेक मांडकुलकर, डॉ. विवेक पाटणकर, डॉ. पी. डी. वजराठकर, आनंद शिरवलकर, नगरसेवक जीवन बांदेकर, भास्कर केरवडेकर, गोवा व सिंधुदुर्ग संचालिका राजयोगिनी शोभादीदी, कुडाळ केंद्रप्रमुख कांचनदीदी, हर्षादीदी, अजयभाई आदींसह भाविक उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित देसाई व नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.
उद्यापर्यंत योग प्राणायाम शिबिर
या महोत्सवात नारळांचा वापर करून १२ फुटी शिवलिंग साकारण्यात आले असून हे या महोत्सवाचे खास आकर्षण ठरत आहे. या महोत्सव कालावधीत विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी ह. भ. प. प्रशांत धोंड यांचे कीर्तन आयोजित केले होते.
मंगळवारी वैद्य सुविनय दामले यांचे आध्यात्मिक आरोग्य या विषयावर व्याख्यान, बुधवारी मोफत मधुमेह तपासणी शिबिर जिल्हा रुग्णालय, ओरोस येथे झाले. गुरुवारी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन केले होते. २२ फेब्रुवारीपर्यंत दररोज सकाळी योग प्राणायाम शिबिर होणार आहे.