गुहागरात शिवसेना-भाजपला सुरूंग

By admin | Published: September 9, 2016 11:38 PM2016-09-09T23:38:05+5:302016-09-10T00:40:04+5:30

भास्कर जाधवांकडून स्वागत : वरवेली, परचुरी, धोपावे, तळघरचे शिवसैनिक राष्ट्रवादीत

Shivsena-BJP in Guhagar | गुहागरात शिवसेना-भाजपला सुरूंग

गुहागरात शिवसेना-भाजपला सुरूंग

Next

गुहागर : गुहागर मतदारसंघात आमदार भास्कर जाधव यांचे नेतृत्व सर्वमान्य होताना दिसत असून, अन्य पक्षांमधील कार्यकर्ते हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर येत असल्याचे दिसत आहे. गुहागर तालुक्यातील वरवेली, परचुरी, धोपावे तर खेड तालुक्यातील तळघर येथील शेकडो शिवसेना-भाजप समर्थक व कार्यकर्त्यांनी आमदार जाधव यांच्या उपस्थितीत राट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
विविध विकासकामांची उद्घाटने व भूमिपूजनांच्या निमित्ताने जाधव हे गुहागर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी वरवेली - रांजाणेवाडी, परचुरी - डाफळेवाडी, धोपावे - पाटीलवाडी आणि तळघर - उगवतवाडीमधील ग्रामस्थांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आहे. ठिकठिकाणी झालेले हे पक्षप्रवेश केवळ एकट्या-दुकट्याचे किंंवा दिखावा नसून, प्रवेशापूर्वीच येथील ग्रामस्थ हे आमदार जाधव यांच्या स्वागताला एकवटलेले पाहावयास मिळाले. या चारही गावांमध्ये जाधव यांना मिरवणुकीने कार्यक्रमस्थळी आणण्यात आले. त्यानंतर जाधव यांच्या हस्ते पाटपन्हाळे -वाकी-पिंंपळवट-तेलगडेवाडी रस्ता, वरवेलीतील गावडे-अवेरेवाडी रस्ता, परचुरी डाफळेवाडीतील शाळा इमारत बांधकाम कामांची भूमिपुजने तर धोपावे येथे ६० लाख निधीतून बांधण्यात आलेल्या पुलाचे उद्घाटन जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमांमध्ये बोलताना जाधव यांनी शिवसेना-भाजपवर सडकून टीका केली. एकदा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर रामदास कदम हे मागील पाच वर्षात या मतदारसंघात फिरकलेले नाहीत. विकासकामांच तर नावच नाही. तरीदेखील निवडणुकीत विजय भोसलेंना गुहागर तालुक्याने ९ हजार ६०० मतं दिली. निवडणूक होऊन आता दोन वर्ष झाली आहेत. कुठे आहेत भोसले, असा सवाल करताना जाधव यांनी चारवेळा निवडून आलेल्या विनय नातूंनी पराभूत झाल्यानंतर फिरकूनही पाहिलं नाही. मात्र, पाच वर्षांनी पुन्हा निवडणुकीला ते उभे राहिले. ही निवडणूक होऊन आता दोन वर्ष झाली आहेत. या दोन वर्षात कधी आले का ते, अशी विचारणा जाधव यांनी यावेळी केली.
जाधव म्हणाले की, भाजप-शिवसेनेचं सरकार आल्यानंतर जाती-धर्मात लढे सुरू झाले आहेत. रोज पोलिसांना मारहाण होतेयं, हे सर्व चित्र पाहिल्यानंतर लोकांना भ्रमनिरास झाल्याचे वाटू लागले आहे. त्यामुळेच सत्ताधारी पक्षाकडे जाण्याऐवजी लोकं विरोधी पक्षाकडे जात आहेत, असे जाधव यांनी धोपावे येथील कार्यक्रमात सांगितले. शिवसेनेचे तीन-तीन मंत्री असूनदेखील शासनाचा अधिक निधी आणून विकास करण्याऐवजी जिल्हा नियोजनच्या निधीवर ते तुटून पडतात, हे जिल्ह्याचं दुर्दैव असल्याचे ते म्हणाले. धोपावेचा पाणीप्रश्न मार्गी लावला असून, येथील रस्त्याची अडचणही लवकरच दूर करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी तालुकाध्यक्ष विनायक मुळ्ये, महिला आघाडी तालुकाध्यक्ष नेत्रा ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर आरेकर, पंचायत समिती सभापती विलास वाघे, उपसभापती सुनील जाधव, सुरेश सावंत, प्रभाकर शिर्के, मंगेश कदम, अजय खातू, इम्रान घारे, नवनीत ठाकूर, प्रशांत विचारे, प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)


विरोधी पक्षात हलचल : कुडली, पाभरे, शिवणेतील शिवसैनिकही दाखल
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भास्कर जाधव यांनी गुहागर मतदार संघात पक्षप्रवेशाचा धुमधडाका लावला आहे. शिवसेना - भाजप कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत घेऊन त्यांनी चांगलाच दणका दिला आहे.
सत्ता आल्यानंतरही आपला विकास होऊ शकत नाही, हे शिवसैनिकांना कळून चुकलं आहे, असे सांगताना ‘जेवढी वर्ष शिवसेनेसाठी दिलीत तेवढे महिनेसुध्दा विकासाची कामं मार्गी लावण्याकरता मला देऊ नका’, असा शब्द यावेळी दिला. कुडली, पाभरे, शिवणे आदी ठिकाणचे शिवसैनिकदेखील गेल्या काही महिन्यांत राष्ट्रवादीत सामील झाल्याची उदाहरणे त्यांनी दिली. भास्कर जाधव यांच्यामुळे गुहागर मतदारसंघात विरोधी पक्षांमध्ये हलचल निर्माण झाली आहे.

Web Title: Shivsena-BJP in Guhagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.