सावंतवाडी खरेदी विक्री संघावर शिवसेनेचे वर्चस्व
By admin | Published: June 5, 2015 11:47 PM2015-06-05T23:47:43+5:302015-06-06T00:24:21+5:30
काँग्रेसचीही मुसंडी : १० जागा जिंकत वर्चस्व राखले
सावंतवाडी : सावंतवाडी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या सहकार वैभव पॅनेलने निर्विवादपणे वर्चस्व राखले असून, १५ जागांपैकी १० जागांवर मोठी आघाडी घेतली. तर काँग्रेसनेही ५ जागा जिंकत जोरदार मुसंडी मारली आहे. संस्था गटातून तीन उमेदवारांना समान मते पडल्याने टाय झाली होती. मात्र, या निवडणुकीचा कौल काँग्रेसच्या बाजूने लागला असून काँग्रेसचे चंद्रकांत राऊळ हे विजयी झाले आहेत. तर विद्यमान चेअरमन गुरुनाथ पेडणेकर यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.
सावंतवाडी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत काँग्रेस व शिवसेनेत थेट लढत होती. प्रथमच या निवडणुकीत आरोप प्रत्यारोप झाले होते. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. काँग्रेसकडून विद्यमान चेअरमन गुरुनाथ पेडणेकर यांच्यासह प्रविण देसाई, शशिकांत गावडे, प्रमोद परब उभे राहिले होते. तर शिवसेनेकडून सखाराम ठाकूर, फ्रान्सिस डिसोजा, गणपत देसाई, अनारोजीन लोबो आदी उभे राहिले होते. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली होती.
शुक्रवारी सकाळपासून राणी पार्वतीदेवी हायस्कूलमध्ये निवडणुकीची प्रकिया सुरू झाली. ही प्रक्रिया सायंकाळपर्यंत पार पडली. त्यानंतर सायंकाळी ५ वाजल्यापासून मतदान केंद्रावरच निवडणूक मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली. यावेळी पहिल्यांदा संस्था गटाची मतमोजणी सुरू झाली. या संस्थागटातून प्रविण देसाई २३, शशिकांत गावडे २०, ज्ञानेश परब २२, प्रमोद परब २१ या चारही जागा काँग्रेसने आपल्याकडे राखल्या. तर शिवसेनेचे बाबल ठाकूर २० मते घेत निवडून आले आहेत. याच निवडणुकीत संस्था गटाचे उमेदवार शिवसेनेचे नारायण सावंत, काँग्रेस चे चंद्रकांत राऊळ व जॉकी डिसोझा यांना समान १९ मते पडल्याने ही जागा टाय झाली होती. निवडणूक निर्णय अधिकारी विनोद चौगुले यांनी या जागेच्या निकालासाठी चिठ्ठी उडवण्याचा निर्णय घेतला आणि यामध्ये चंद्रकांत राऊळ हे विजयी झाले. त्यामुळे संस्था गटातून ५ जागा जिंकत काँग्रेसने वर्चस्व राखले.
तर उर्वरित जागांवर व्यक्तिगत मतदारसंघात शिवसेनेचे अरुण गावडे, संदीप केसरकर, भदू नाईक, मुकुंद राऊळ हे विजयी झाले आहेत. मागास वर्ग प्रतिनिधीत शिवसेनेचे दीपक जाधव हे १५ मतांनी निवडून आले आहेत.
महिला प्रतिनिधींमध्ये शिवसेनेच्या अनारोजीन लोबो व मंजुषा गावडे यांनी अनुक्रमे २६७ मते घेत विजय कायम राखला आहे. भटक्या विमुक्त जातीमधून शिवसेनेचे दत्ताराम कोळमेकर हे विजयी झाले असून इतर मागास प्रतिनिधीमधूनही शिवसेनेचे महादेव सोनुर्लेकर यांनी विजय संपादन केला आहे. (प्रतिनिधी)