सिंधुदुर्ग : शिवसेनेकडून जिल्हा प्रबंधक धारेवर, दूरसंचारच्या कंत्राटी कामगारांना पगारच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 04:23 PM2018-09-11T16:23:05+5:302018-09-11T16:29:38+5:30
कंत्राटी कामगारांचा पगार का नाही दिला याचा जाब सोमवारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रबंधक मिलिंद क्षीरसागर यांना विचारला.
सावंतवाडी : गणपती उत्सव दोन दिवसांवर आला तरी कंत्राटी कामगारांचा पगार का नाही दिला याचा जाब सोमवारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रबंधक मिलिंद क्षीरसागर यांना विचारला. यावेळी आम्हांला कोणतेही कारण न देता मंगळवारी दुपारपर्यंत कामगारांचा पगार झाला पाहिजे, अन्यथा कार्यालयातच ठिय्या आंदोलन करु,असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला. दरम्यान, दोन ठेकेदारांकडून दोन महिन्यांचे पगार देण्याची ग्वाही दिल्याचे क्षीरसागर म्हणाले. तसे लेखी पत्रही त्यांनी लिहून दिले.
जिल्ह्यात दूरसंचारकडे कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कामगारांचा गेल्या पाच महिन्यांचा पगार थकीत आहे. याबाबत वेळोवेळी दूरसंचार विभागाचे लक्ष वेधूनही त्यांना पगार न दिल्याने सोमवारी शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हा प्रबंधक मिलिंद क्षीरसागर यांना घेराव घातला.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य अशोक दळवी, नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, राघोजी सावंत, गजानन नाटेकर, मेघ:श्याम काजरेकर, संदीप माळकर, राजू शेटकर, उपजिल्हाप्रमुख अॅड. नीता कविटकर- सावंत, नगरसेविका अनारोजीन लोबो, शुभांगी सुकी, भारती मोरे, तालुका संघटक रश्मी माळवदे आदी उपस्थित होते.
दरम्यान, तुम्हाला कामगारांच्या पगाराबाबत गांभीर्य नाही. ज्याने दूरसंचारचा ठेका घेतला त्याने स्वत:च्या खिशातून पगार दिला पाहिजे. आम्हाला कंपनीशी देणे-घेणे नाही, असे महिला उपजिल्हाप्रमुख नीता सावंत- कविटकर यांनी सुनावले.
यावेळी आक्रमक झालेल्या पदाधिकाऱ्यांनी ठेकेदारालाच बोलवा असे सुनावले. यावेळी क्षीरसागर यांनी ठेकेदाराशी फोनवर बोलणे केले असता त्यांनी येण्यास नकार दिला. यावर पदाधिकारी आक्रमक होत ह्यतुम्ही ठेकेदाराची पाठराखण करत आहात, या मागचा हेतू कायह्ण असे सुनावले.
अखेर गणपती उत्सव लक्षात घेता कामगारांचे पगार मंगळवारी दुपारी दोन वाजेपर्यंत त्यांच्या खात्यावर जमा झाला पाहिजे. तसे आम्हाला लेखी द्या, अशी मागणी सर्वांनी लावून धरली. त्यावर कंपनीने काही ठेकादारांची बिले जमा केली असून प्रत्येक ठेकेदाराकडून एक-एक महिन्याचा पगार देण्याची ग्वाही क्षीरसागर यांनी पदाधिकाºयांना दिली. तसे लेखी पत्र त्यांनी दिल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी माघार घेतली.
कामगारांचे पगार मंगळवारी दुपारपर्यंत झाले पाहिजे. तसे लेखी पत्र आम्हाला द्या. त्यामध्ये किती पगार थकीत आहे व किती दिला याचा उल्लेख असावा. असे असूनही त्यांच्या खात्यावर पगार जमा न झाल्यास कार्यालयातच ठिय्या करणार, असा इशारा नीता सावंत यांनी दिला.
तर राजीनामा देतो
कामगारांच्या प्रश्नावर उशिरा आलेल्या शिवसेना तालुका प्रमुख व दूरसंचारचे सल्लागार समिती सदस्य रुपेश राऊळ यांनीही ठेकेदार बोलावून येत नसेल तर तुम्ही ठेकेदाराला पाठीशी घालत आहात हे स्पष्ट होते. ही चुकीची बाजू असून मला दूरसंचारच्या सल्लागार समितीवर काम करण्यात काहीच रस नाही. मी पदाचा राजीनामा देतो, असे रुपेश राऊळ यांनी क्षीरसागर यांना सुनावले.