विनाकारण कुणी त्रास दिल्यास सहन करणार नाही : उदय सामंत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 11:35 AM2020-01-13T11:35:46+5:302020-01-13T11:43:57+5:30
सिंधुदुर्गचा विकासात्मक कायापालट केल्याशिवाय राहणार नाही व तुम्ही केलेला सत्कार फुकट जाणार नाही असा शब्द मी तुम्हाला देतो, अशी ग्वाही उदय सामंत यांनी यावेळी दिली.
सिंधुदुर्ग : मी कुणाला नाहक त्रास देणार नाही आणि तसा माझा पिंडही नाही. मात्र, आम्हांला कुणी त्रास दिला तर तो सहन करणार नाही. हे विरोधकांनी विसरू नये, असा इशारा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला. कणकवली महाविद्यालयाच्या एचपीसीएल सभागृहात आयोजित शिवसेना मेळाव्यात ते बोलत होते.
शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्गच्या पालकमंत्री पदाची जवाबदारी माझ्यावर देऊन जो विश्वास टाकला आहे, त्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही. मी कुणाला नाहक त्रास देणार नाही आणि तसा माझा पिंडही नाही. मात्र, आम्हांला कुणी त्रास दिला तर तो सहन करणार नाही. कारण माझा जन्मही सिंधुदुर्गच्या भूमीत झालेला आहे. हे विरोधकांनी विसरू नये, असा इशारा उदय सामंत यांनी दिला.
तर भविष्यात गोव्यातील लोकं सिंधुदुर्गातील विकास पाहून त्याबाबत सिंधुदुर्गचे अनुकरण करतील.मी चार वेळा आमदार झालो.जनतेने माझ्यावर जो विश्वास दाखविला तोच विश्वास सिंधुदुर्गवासियांनी माझ्यावर व शिवसेनेवर एकवेळ ठेवून पहावा असेही सामंत म्हणाले.
तसेच सिंधुदुर्गचा विकासात्मक कायापालट केल्याशिवाय राहणार नाही व तुम्ही केलेला सत्कार फुकट जाणार नाही असा शब्द मी तुम्हाला देतो, अशी ग्वाही उदय सामंत यांनी यावेळी दिली. तर शिवसेनेच्या माध्यमातून माजी मंत्री दीपक केसरकर यांनी चांदा ते बांदा या योजनेच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी आणला.अर्थ व नियोजन राज्यमंत्रीपदाचा वापर करीत इतर जिल्ह्यात जेवढा निधी खर्च झाला नसेल त्यापेक्षा जास्त निधी सिंधुदुर्गात त्यांनी खर्च केला असल्याचेही सामंत म्हणाले.