केसरकरांच्या करिष्म्यावर शिवसेनेचा चमत्कार अवलंबून

By admin | Published: November 9, 2016 12:46 AM2016-11-09T00:46:37+5:302016-11-09T00:42:20+5:30

बालेकिल्ल्यात सहकाऱ्यांचे आव्हान : शिवसैनिकांतील रुंदावलेली दरी दूर करण्याची गरज

Shivsena's miracle depends on Kesarkar's charisma | केसरकरांच्या करिष्म्यावर शिवसेनेचा चमत्कार अवलंबून

केसरकरांच्या करिष्म्यावर शिवसेनेचा चमत्कार अवलंबून

Next

अनंत जाधव -- सावंतवाडी  शहर गेली पंधरा वर्षे सध्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचा बालेकिल्ला आहे. मात्र, प्रथमच केसरकरांना बालेकिल्ल्यात त्यांच्याच सहकाऱ्यांनी आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातच जुन्या-नव्या शिवसैनिकांत रुंदावलेली दरी यामुळे मागील निवडणुकीसारखा करिष्मा जर दीपक केसरकरांना करायचा असेल, तर चमत्कार घडवावा लागणार आहे. त्यामुळे काय घडते याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
सावंतवाडी शहर दीपक केसरकरांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गेली पंधरा वर्षे नगरपालिकेवर केसरकर यांनी अबाधित सत्ता राखत सर्व विरोधी पक्षांना धूळ चारली होती. १९९७ च्या सुमारास दीपक केसरकर यांनी नगरपालिकेची सत्तासूत्रे हाती घेतल्यापासून आता मंत्री होईपर्यंत एकहाती बालेकिल्ला राखला आहे.
मागच्या निवडणुकीत तर दीपक केसरकर हे आमदार होते. त्यांनी राज्यात काँग्रेससोबत आघाडी असताना सावंतवाडीत मात्र आघाडी करण्याचे टाळत थेट लढत झाली होती. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसने सतराच्या सतराही जागांवर विजय मिळवत काँग्रेसला ‘व्हाईटवॉश’ दिला होता. मात्र, दोन वर्षांपूर्वी दीपक केसरकर हे राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनावासी झाले आहेत. त्यांच्याबरोबरच दोन नगरसेवक वगळता सर्वजण शिवसेनेत दाखल झाले.
पण ऐन निवडणुकीदरम्यान नगराध्यक्षपदाचा उमेदवार ठरविण्यावरून शिवसेनेत एक वेगळेच नाट्य पाहायला मिळाले. दीपक केसरकर हे दोन वर्षांपूर्वी शिवसेनावासी झाले, तरीही सावंतवाडी नगरपालिकेवर शिवसेनेचे वर्चस्व दिसून येत नव्हते. नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनीही शिवसेना पक्षाच्या सर्व कार्यक्रमांपासून अलिप्त राहण्याचे धोरण स्वीकारले होते. त्यामुळे ऐन निवडणुकीदरम्यान नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून बबन साळगावकर यांचे नाव घोषित करताना शिवसेनेच्या चांगलेच नाकेनऊ आले. साळगावकर यांना उमेदवारी देण्यावरून केसरकरांच्या सहकाऱ्यांमध्येही उभी फूट पडली. मात्र, अखेर नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची माळ बबन साळगावकर यांच्या गळ्यात पडली, तरी दुसरे सहकारी विद्यमान उपनगराध्यक्ष राजन पोकळे हे चांगलेच नाराज झाले. त्यांनी नगराध्यक्षपदासाठी अपक्ष निवडणूक लढविली आहे. त्याचबरोबर एक नगरसेवक व चार नगरसेविकांनीही अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यातील चार नगरसेविकांचा अर्ज अवैध ठरला आहे, तर नगरसेवक सुदन्वा आरेकर यांच्यासह उपनगराध्यक्षांचा अर्ज कायम आहे. उपनगराध्यक्षांनी नगराध्यक्षपदासाठी केलेली बंडखोरी ही मंत्री केसरकर यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्यांनी त्यांची मनधरणी करण्याचाही प्रयत्न केला; पण त्यात त्यांना अद्याप यश आले नाही. खासदार विनायक राऊत यांनीही पोकळे यांच्याशी चर्चा केली आहे. मात्र, यातून सकारात्मक तोडगा निघेल, अशी अपेक्षा असून सर्वांच्या नजरा ११ नोंव्हेबरकडे लागून राहिल्या आहेत. त्यातच जुन्या-नव्या शिवसैनिकांत शहरात छुपा संघर्ष आहे. मंत्री असूनही दीपक केसरकर आम्हाला विश्वासात घेत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हा संघर्ष नगरपालिका निवडणुकीत प्रामुख्याने दिसून आला. बबन साळगावकर यांना उमेदवारी दिल्याचे कारण पुढे करीत जुन्या शिवसैनिकांनी दीपक केसरकर यांच्या कार्यालयात पदाधिकाऱ्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, मंत्री केसरकर यांनी यावर तोडगा काढत जुन्या दोन शिवसैनिकांना उमेदवारी देत त्यांचा राग शांत केला असला, तरी छुपा संघर्ष मात्र कायम असल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे सावंतवाडी नगरपालिकेत जर काँग्रेसला व्हाईटवॉश द्यायचा असेल, तर मंत्री केसरकर यांना जोरदार प्रयत्न करावे लागणार आहेत. शिवसेनेची भाजपसोबतची युती अद्याप झाली नाही. त्याचबरोबर भाजपने शहरात चांगल्यापैकी पाय पसरायला सुरुवात केली आहे. सतराच्या सतरा जागांवर उमेदवार उभे करीत शिवसेनेलाही धक्का दिला आहे. भाजपने जर मोठ्या प्रमाणात शहरात मते घेतली, तर त्याचा फटका सेनेला बसणार आहे. शिवसेना व भाजपची मतविभागणी झाली तर काँग्रेसला त्याचा फायदा होईल. याचा बोध शिवसेनेने घेतला असला, तरी भाजप युती न करण्यावर अद्याप ठाम आहे. तसेच दीपक केसरकर हे मंत्री झाल्याने त्यांना सावंतवाडीबरोबरच जिल्ह्यातील इतर पालिकांमध्येही लक्ष घालावे लागणार आहे. त्यामुळे याठिकाणी वेळ कमी दिला जाईल. त्यांच्यानंतर सावंतवाडीची जबाबदारी घेण्याएवढा सक्षम पदाधिकारी नसल्याने त्याची उणीव कायम भासत राहील. नगराध्यक्षपदाचे उमेदवार बबन साळगावकर हे आपल्यापरीने शहरात प्रचार करीत आहेत, पण निवडणूक यंत्रणा ते राबवू शकणार नाहीत. ते सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन काम करू शकतात. हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे केसरकर यांना जास्तीत जास्त लक्ष शहरातही द्यावे लागणार आहे, तरच ते चमत्कार घडवू शकतील. अन्यथा काठावरचे बहुमत तरी मिळवू शकतात, हे नक्की आहे.


साळगावकरांचा पारदर्शक कारभार जमेची बाजू
सावंतवाडी नगरपालिकेत गेली पाच वर्षे बबन साळगावकर हे नगराध्यक्ष म्हणून काम करीत आहेत. या काळात त्यांच्यावर विरोधकांनी एकही भ्रष्टाचाराचा आरोप केला नाही किंवा त्यांच्या कामात कोणी आडकाठी आणली नाही. त्यामुळे बबन साळगावकर यांच्या पारदर्शक कामाबरोबरच स्वच्छ प्रतिमा ही शिवसेनेकडे जमेची बाजू असून, त्याचा फायदा शिवसेनेला होणार आहे.

Web Title: Shivsena's miracle depends on Kesarkar's charisma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.