सिंधुदुर्गचे शिवसेनेचे पदाधिकारी निष्क्रीय : राणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 04:39 PM2017-10-14T16:39:41+5:302017-10-14T16:46:52+5:30
सिंधुदुर्गचे शिवसेनेच्या तिन्ही पदाधिकाऱ्यानी जिल्ह्याचा बट्ट्याबोळ केला आहे. तिघेही निष्क्रीय आहेत. पालकमंत्री नको ते धंदे करीत सुटले आहेत. या तिघांचेही काम काय ते त्यांनी सांगावे आणि नंतर मते मागावीत. जिल्ह्याच्या इतिहासात एवढा निष्क्रीय पालकमंत्री झाला नाही, असा आरोप नारायण राणे यांनी केला.
कणकवली , दि. १४ : सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक या शिवसेनेच्या तिन्ही पदाधिकाऱ्यानी जिल्ह्याचा बट्ट्याबोळ केला आहे. तिघेही निक्रीय आहेत. पालकमंत्री नको ते धंदे करीत सुटले आहेत. ते जातात कधी, येतात कधी तेच कळत नाही. या तिघांचेही काम काय ते त्यांनी सांगावे आणि नंतर मते मागावीत. जिल्ह्याच्या इतिहासात एवढा निष्क्रीय पालकमंत्री झाला नाही, असा आरोप नारायण राणे यांनी केला.
मालवण तालुक्यातील पडवे येथील लाईफलाईन रुग्णालयात शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित देसाई व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
राणे पुढे म्हणाले, गेल्या तीन वर्षात रेशनिंगवर धान्य नाही. रॉकेल मिळत नाही. सी-वर्ल्ड, विमानतळाचे काम रखडले आहे. आयटी पार्क, दोडामार्ग एमआयडीसी या महत्त्वाच्या कामांबरोबच जिल्ह्यातील रस्ते व पायाभूत सुविधा यांची कामे मी केली होती. पण आता कोणतेच काम मार्गी लागलेले नाही. जिल्ह्याचा विकास ठप्प झाला आहे. जिल्ह्यात कोणतेही काम न करणाऱ्या शिवसेनेला ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान करू नका, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.
पालकमंत्र्यांचे कारनामे उघडे करीन
राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पालकमंत्र्यांना हे खड्डे बुजविता आले नाहीत. ते जास्त वेळ गोव्यात असतात. मंत्री महाराष्ट्राचे व गोव्यात जास्त वास्तव्य का? असा सवाल त्यांनी केला. जिल्हाधिकारी कार्यालयात शिपायाला मान आहे तितका मान पालकमंत्र्यांना नाही. सिंधुदुर्गात पालकमंत्र्यांना कोण विचारत नाही. तर महाराष्ट्रात कोण विचारणार, मंत्रालयात ते काय करतात ते जाहीर करीन. पालकमंत्र्यांचे सर्व कारनामे उघडे करीन, असा इशारा राणे यांनी दिला.
खासदारांनी एकही प्रकल्प आणला नाही
खासदार विनायक राऊत यांच्यावर त्यांनी सडकून टीका करताना राणे म्हणाले, राऊत यांची १३ प्रकरणे मी बाहेर काढीन. त्यांना सभागृहात बोलताही येत नाही. कुठे काय बोलावे, काय करावे तेही कळत नाही. खासदारांनी जिल्ह्यात एकही प्रकल्प आणला नाही. राणेंची जास्त बदनामी केल्यास पार्ल्याचा इतिहास सांगावा लागेल. आमदार वैभव नाईक जनतेची दिशाभूल करत आहेत. त्यांनी ३ वर्षात विकासाचे कोणतेही काम केलेले नाही.
महामार्गावरील खड्ड्यांबाबत बांधकाममंत्र्यांशी चर्चा
मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांबाबत आपण बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केलेली आहे. मी मुख्यमंत्री, महसूलमंत्री, विरोधी पक्ष नेता अशी पदे भूषविली आहेत. जिल्ह्यात इंजिनिअरिंग महाविद्यालय, मेडिकल महाविद्यालय, डॉन बॉस्को हायस्कूल, ऊर्सुला हे इंग्रजी माध्यमाचे हायस्कूल, रस्त्याची कामे, पायाभूत सुविधा, गावागावातील विकासकामे केली. पण शिवसेनेच्या या तिन्ही पदाधिकाºयांना काहीही जमलेले नाही. माझ्या काळात महाराष्ट्रात सिंधुदुर्गचे नाव होते. आता राज्यात सिंधुदुर्गची बदनामी होत आहे. पालकमंत्री निष्क्रीय आहेत. त्यामुळे त्यांना आपण सोडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
समर्थ विकास पॅनेलच विकास करू शकतो
समर्थ विकास पॅनेलच विकास करू शकतो. कुणीही दावे करीत असेल तर त्या अपप्रचारावर विश्वास ठेवू नका. कुणाच्या किती ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या त्याची माहिती हवी असेल तर प्रशासनाकडे चौकशी करा, असे आवाहन त्यांनी केले.
२६६१ ग्रामपंचायत सदस्यांपैकी ५५९ सदस्य समर्थ विकास पॅनेलचे बिनविरोध निवडून आले आहेत, असे त्यांनी सांगितले. लोकांनी गावच्या विकासासाठी समर्थ विकास पॅनेलला साथ देणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
लोकमतच्या वृत्ताची दखल
घर नोंदणीचे अधिकार तहसीलदारांकडे दिल्यानंतर ग्रामस्थांची कशी ससेहोलपट होते याचे सविस्तर वृत्त लोकमतने प्रसिद्ध केल्यानंतर त्याची दखल घेऊन नवीन घर नोंदणीचे अधिकार ग्रामपंचायतीकडे देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती नारायण राणे यांनी दिली.
पक्ष नोंदणीचे सोपस्कार २0 आॅक्टोबरपर्यंत
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा घटना व उद्देश तयार करण्याचे काम सुरू असून २0 आॅक्टोबरपर्यंत पक्ष नोंदणीसाठीचे सोपस्कार पूर्ण करू, असे त्यांनी सांगितले. २0 आॅक्टोबरनंतर महाराष्ट्रात स्वाभिमान पक्षाचे काम वाढवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माजी खासदार निलेश राणे व आमदार नीतेश राणे यांनी जी आंदोलने केली ती जनतेसाठी केली. मग निलेश व नीतेशवर गुन्हे कशासाठी लावता, असा सवाल त्यांनी केला.