शिवसेनेची वाटचाल काँग्रेसच्या मार्गावर?

By admin | Published: April 10, 2015 10:22 PM2015-04-10T22:22:32+5:302015-04-10T23:50:11+5:30

- कोकण किनारा

Shivsena's path to Congress? | शिवसेनेची वाटचाल काँग्रेसच्या मार्गावर?

शिवसेनेची वाटचाल काँग्रेसच्या मार्गावर?

Next

ए क काळ असा होता की ज्यावेळी जिल्ह्यातील प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था, सर्व सहकारी संस्था काँग्रेसकडे होत्या. इतर पक्षांना औषधापुरतं यश मिळत होते. पण या यशामुळे नेत्यांची संख्या वाढत गेली. नेते वाढले तसे गट वाढले, पक्षाची अंतर्गत विभागणी वाढली. त्यामुळे बंडखोरी वाढली आणि अखेर काँग्रेसचा ऱ्हास झाला. इतर कुठल्याही पक्षाने पराभूत करण्यापेक्षा काँग्रेसला काँग्रेसनेच पराभूूत केले. शिवसेनेची आताची वाटचालही त्याच मार्गावर सुरू झाली आहे. शिवसेना वाढायला सुरूवात झाली, तेव्हा ‘आदेश’ हीच गोष्ट प्रमाण होती. बंडखोरी करणे, गटबाजी करणे याला तेथे थारा नव्हता. पण वेगवेगळ्या टप्प्यावर शिवसेनेला यश मिळू लागले आणि शिवसेनेतही नेत्यांची संख्या वाढू लागली. हळुहळू गटबाजी वाढू लागली. स्वत:चे श्रेष्ठत्त्व सिद्ध करून पुढे जाण्यासाठी एकमेकांना मागे ओढण्याची प्रथा वाढीस लागली. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी हे बंडखोरीचे आणि गटबाजीचे वातावरण तयार झाले. आताच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून हे पुन्हा एकदा पुढे येऊ लागले आहे.
यश मिळणे एकवेळ सोपे असते, पण यश पचवण्यासाठी खूप संयम असावा लागतो. शिवसेनेने सर्वसामान्य माणसावरील अन्यायाला वाचा फोडली. थेट आणि आक्रमक काम करण्याच्या पद्धतीमुळे शिवसेना सर्वसामान्यांना भावली. रत्नागिरी जिल्ह्यात विशेषत: कोकणात शिवसेना अधिक लवकर रूजली. मुंबईत बहुतांश मराठी वर्ग हा कोकणातला असल्याने शिवसेनेला मुंबईबरोबरच कोकणातही जोरदार यश मिळालं. सत्ता मिळेपर्यंत शिवसेना एकसंध होती. त्याही काळात वाद होतेच; पण त्याला तीव्र स्वरूप आले नव्हते. १९९५ साली सत्ता मिळाली आणि तिथून गटबाजीला सुरूवात झाली. त्यानंतर प्रत्येक टप्प्यावर वर्चस्वासाठीचा संघर्ष जोर धरू लागला. जिल्हा प्रमुख आपल्याच मर्जीतील असावा, म्हणून वरिष्ठ पातळीवर गटतट तयार झाले. मग साहजिकच तेच गट तळापर्यंत झिरपत राहिले.
सत्ता गेल्यानंतरही गटबाजीचे प्रमाण कमी झाले नाही. अर्थात मध्यंतरीच्या काळात काही नेते शिवसेना सोडून गेल्यामुळे माणसे विभागली गेली. नारायण राणे यांना मानणारा शिवसेनेतील गट त्यांच्यासोबत काँग्रेसमध्ये गेला. अर्थात जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्ता कायम असल्याने गटबाजीचे प्रकार छोट्या स्वरूपात सुरूच होते.
लोकसभा निवडणुकीच्या काही काळ आधीपासून खासदार अनंत गीते यांनी संघटनात्मक बदलांमध्ये विशेष लक्ष घातले. त्याआधी जिल्हा संघटनेवर रामदास कदम यांचा अधिक पगडा होता. उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील पदांवरही त्यांचाच वरचष्मा होता. मात्र, लोकसभा निवडणुकीपूर्वीच त्यात बदल झाला आणि या पदांवर गीते यांचा वरचष्मा निर्माण झाला.
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक मंडळी काँग्रेसमध्ये दाखल झाली. त्यात नेत्यांबरोबरच पदाधिकारी होते आणि कार्यकर्तेही होते. या बदलाचे शिवसेनेत संमिश्र स्वागत झाले. पण लोकांनी मात्र हा बदल खूप मोठ्या संख्येने स्वीकारला. शिवसेनेच्या नाराज वाटणाऱ्या लोकांनी आपली नाराजीही उघड केली नाही आणि पाठिंबाही उघड केला नाही. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला घवघवीत यश मिळाल्यामुळे अनेक गोष्टी पडद्याआड गेल्या. मात्र, आता त्या पुढे येऊ लागल्या आहेत. आता निमित्त आहे ते ग्रामपंचायत निवडणुकांचे.
राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये अनेक पदाधिकारी सक्षम आहेत. त्यांनी राष्ट्रवादीत वेगवेगळ्या पदांवर काम करताना स्वत:चा ठसा उमटवला आहे. त्यामुळे त्यांना शिवसेनेत गेल्यानंतर त्यांच्या क्षमतेच्या पदाची अपेक्षा आहे. पण अजून त्यापैकी कोणालाही पद मिळालेले नाही.
आता निवडणुकीचे अर्ज भरताना मात्र ‘आपली माणसे योजना’ प्राधान्याने पुढे आली आहे. रत्नागिरी तालुक्यात अनेक ठिकाणी शिवसेनेचेच एकापेक्षा अधिक उमेदवार असल्याची माहिती पुढे येत आहे. शहरालगतच्या महत्त्वाच्या ग्रामपंचायतींमध्ये ही समस्या अधिक आहे. यातून शिवसेनेत जुने-नवे असा वाद पुढे येऊ लागला आहे. मालगुंड, वरवडे, खंडाळा हा शिवसेनेचा बालेकिल्ला. तेथेही हीच समस्या पुढे येत आहे. नव्या-जुन्यांचे एकत्रिकरण ही डोकेदुखी आणखी बराच काळ शिवसेनेला सहन करावी लागणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुका पक्षीय चिन्हावर निवडल्या जात नाहीत. पण त्यात पक्षीय अभिनिवेश असतोच. निवडणुका झाल्यानंतर ग्रामपंचायत आमचीच असल्याचा दावा करण्यासाठी या निवडणुकांमध्येही पक्षीय वातावरण असते. अर्थात तरीही या निवडणुकीत गावपातळीवर निर्णय घेतले जाण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे त्यात नवे-जुने वाद होण्याचे प्रमाण एकवेळ आटोक्यात राहीलही. पण दोन वर्षांनी येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीत हा वाद अजून डोके वर काढेल. जिल्हा बँकेची निवडणूक शिवसेनेसाठी कधीही हमरीतुमरीची नव्हती. त्यामुळे या निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या अधिक असल्याचे चित्र याआधीही कधी दिसले नव्हते. याहीवेळी तसे नाही. पण आताच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका आणि दोन वर्षांनी येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुका यात शिवसेना नेत्यांची कसोटी लागणार आहे, हे खरे आहे. हीच बाब जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्येही अडचणीची होणार आहे. मुळात शिवसेना बळकट आणि शिवसेनेत आलेले राष्ट्रवादीचे पदाधिकारी सक्षम. त्यामुळे हा संघर्ष अटळ आहे.
जिल्हास्तरावर शिवसेनेत नेत्यांची संख्या वाढायला लागली आहे. मुळात एका जिल्ह्यात दोन जिल्हाप्रमुख असल्याने संघटना विभागली गेली आहे. शिवसेनेची खासियत असलेला एकसंधपणा, एकजिनसीपणा आता कमी झाला आहे. वाढती गटबाजी, विभागला जाणारा पक्ष, नेत्यांची वाढती संख्या यामुळे शिवसेनेची वाटचाल काँग्रेसच्याच मार्गाने सुरू असल्यासारखे दिसत आहे.

- मनोज मुळ््ये-

Web Title: Shivsena's path to Congress?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.