शिवसेनेची अवस्था सर्कशीतील वाघासारखी
By admin | Published: May 13, 2016 11:41 PM2016-05-13T23:41:04+5:302016-05-13T23:41:04+5:30
सचिन सावंत यांची टीका : संदीप सावंत यांचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील
सावंतवाडी : खासदार किरीट सोमय्यांनी शिवसेनेच्या नेत्यांवरच आरोप करून खळबळ माजवली. मात्र, शिवसेना अद्याप गप्प आहे. शिवसेनेत त्यावर प्रतिक्रियाही उमटत नसून शिवसेनेची अवस्था आता सर्कशीतील वाघासारखी झाली आहे, अशी जोरदार टीका महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी चिपळूण तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांच्याबद्दल पक्षश्रेष्ठीच योग्य तो निर्णय घेतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष संजू परब, सरचिटणीस मंदार नार्वेकर, शहरअध्यक्ष सुधीर आडिवरेकर, संतोष जोईल, गुरू वारंग आदी उपस्थित होते. सचिन सावंत म्हणाले, खासदार किरिट सोमय्यांनी शिवसेनेच्या नेत्यांवरच तसेच पीए व मेहूणे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. पण शिवसेनेने त्यावर पलटवार केला नाही. शिवसनेने सत्य काय ते जनतेसमोर सांगितले पाहिजे. पण ते सांगितलेले नाही. कोकणाने शिवसेनेला भरभरून दिले. पण शिवसेनेने कोकणला काय दिले? आजही अनेक ठिकाणी विकास कामे ठप्प आहेत. सिंधुदुर्गला एक मंत्री पद दिले. पण त्याचा कोणताही फायदा कोकणला मिळत नाही. राज्याचे अर्थराज्यमंत्री असून, त्यांना फोटोसेशन पुरते दाखवले जाते. नंतर त्यांचा पत्ताच नसतो, असा आरोपही यावेळी सावंत यांनी केला आहे.
राज्यात विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी होईल, असे सांगत असतानाच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे कायमस्वरूपी मित्र आहोत, असे कोणी समजू नये, असा खुलासाही त्यांनी यावेळी केला. विधानसभेत दोन्ही पक्षांचे बळ लक्षात घेता युती शासनाच्या चुकीच्या गोष्टींना विरोध करण्यासाठीच आम्ही एकत्र आलो असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. राज्यात भाजप सरकार भ्रष्टाचारात गुंतले आहे. त्यांच्याकडे ठोस कार्यक्रम राहिला नसल्याचे आरोपही सावंत यांनी यावेळी केला.
चिपळणूचे तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांना झालेल्या मारहाणीबाबत काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीच योग्य तो निर्णय घेतील, हा विषय वरिष्ठ पातळीवरचा आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
काँग्रेस नारायण राणेंना विधान परिषदेची उमेदवारी देईल का? असे विचारले असता तो निर्णय दिल्लीमध्ये होत असतो. त्यांच्याशी स्थानिक नेतृत्वाचा कोणताही प्रश्न नसतो. राणेंना उमेदवारी दिल्यास काँग्रेसचा आवाज विधान परिषदेत आणखी बुलुंद होईल. तसेच राणेंना कोणत्याही कुबड्यांची आवश्यकता लागणार नाही. ते काँग्रेसचे सामर्थ्यवान नेते आहेत. पक्षश्रेष्ठी त्यांच्या कार्याची निश्चितच दखल घेतील असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)