जंगलात साखळीने बांधलेल्या 'त्या' अमेरिकन महिलेबाबत धक्कादायक माहिती उघड, पोलिसांना दिला जबाब
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 12:58 PM2024-08-06T12:58:36+5:302024-08-06T12:59:35+5:30
रत्नागिरी मनोरुग्णालयात उपचार सुरू
सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) : सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली रोणापाल येथील जंगलात लोखंडी साखळीने बांधलेल्या स्थितीत आढळून आलेल्या त्या महिलेचा तो बनावच असल्याचे उघड झाले आहे. या महिलेवर रत्नागिरी मनोरुग्णालयात उपचार सुरू असून, तिच्या तब्येतीला आराम मिळाल्यानंतर तिने शनिवारी पोलिसांना जबाब दिला आहे. यात त्या ‘साखळदंडाने बांधून ठेवलेल्या’ प्रकरणाची सत्य बाजूच पोलिसांकडे कथन केली आहे. तसेच तिने मीच स्वत:च आपले जीवन संपवून घेण्यासाठी हे सर्व कुभांड रचल्याचे या जबाबात म्हटले आहे.
सोनुर्ली रोणापाल येथील घनदाट जंगलात २७ जुलैला अमेरिकन महिला ललिता कायी कुमार एस ही साखळदंड बांधलेल्या अवस्थेत आढळून आली. या महिलेने पतीचे नाव घेतल्याने पोलिसांनी त्या दृष्टीने तपासाची चक्रे फिरवली. सुरुवातीला पोलिसांनाही असेच वाटले की, पतीनेच या महिलेला मारण्याचा कट आखला असावा म्हणून सिंधुदुर्ग पोलिसांकडून कसून तपास करण्यात आला.
महिलेने आपण तामिळनाडूमधील असल्याचे सांगितल्याने पोलिसांनी तामिळनाडू तसेच गोवा या भागात तपास पथके पाठविली आहेत. सध्या ही तपास पथके तेथेच तपास करत आहेत. मात्र, दुसरीकडे या महिलेकडून पोलिसांना हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. महिलेची थोडी मानसिक स्थिती खराब असल्याने सुरुवातीला गोवा येथील रुग्णालयात, तर तेथून रत्नागिरी येथील मनोरुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
या काळात अनेकवेळा पोलिसांनी महिलेचा जबाब नोंदविण्याचा प्रयत्न केला; पण त्याला हवा तसा प्रतिसाद त्या महिलेकडून देण्यात येत नव्हता. त्यामुळे पोलिसांकडून स्थितीजन्य मुद्द्यावर तपास सुरू केला होता. त्यात अनेक मुद्दे समोर आले होते. त्यावरूनच पोलिसांना हा सर्व बनाव असल्याचे दिसून येत होते; पण ही महिला अमेरिकन असल्याने पोलिस ही थोडे गुप्त पद्धतीने तपास करत होते.
अखेर दोन दिवसांपूर्वी रत्नागिरी येथील मनोरुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्या महिलेचा जबाब नोंदविण्याची परवानगी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. त्यावरून बांदा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय बडगे यांनी शनिवारी जाऊन जबाब नोंदविला यात तिने मी स्वत:च आपले जीवन संपवून घेण्यासाठी साखळदंडाने बांधून घेतले होते. मला कोणीच बांधून घातले नाही. मी मडुरा येथील स्थानकात उतरून त्या जंगलात गेली होती. भारतातील व्हिसा संपला होता. तसेच मला माझ्या नातेवाइकांकडून पैसे येणे बंद झाले होते. त्यामुळेच हे पाऊल उचलले असल्याचे त्या महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. याला सहायक पोलिस बडगे यांनीही दुजोरा दिला आहे.
दिल्ली, गोवा, बंगळुरू येथील रुग्णालयात उपचार
अमेरिकन महिला ललिता कायी कुमार एस ही महिला अनेक वर्षांपासून मनोरुग्ण आहे. तिच्यावर तामिळनाडू तसेच गोवा, बंगळुरू, दिल्ली येथील रुग्णालयांत उपचार सुरू होते. तशी कागदपत्रेही पोलिसांना मिळाली असून, तिच्या बॅगेत औषधे ही मिळाली आहेत. या औषधांची प्राथमिक माहिती पोलिसांनी घेतल्यानंतर ती मनोरुग्णांना देण्यात येतात, असेही पोलिस तपासात पुढे आले आहे.