आंगणेवाडीच्या महायात्रेसाठी दुकाने सजली, प्रशासकीय यंत्रणा सज्ज, सलग सुट्ट्यांमुळे लाखोंचा जनसमुदाय लोटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2018 10:13 PM2018-01-23T22:13:11+5:302018-01-23T22:15:42+5:30

दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळख लाभलेल्या मालवण तालुक्यातील मसुरे आंगणेवाडीच्या श्री देवी भराडीची महायात्रा अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपली आहे. मंदिर परिसरात यात्रोत्सावाची तयारी गतिमानरित्या सुरु झाली आहे. स्थानिक मंडळ आणि प्रशासकीय यंत्रणांकडून यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी कंबर कसली आहे.

Shops to be organized for the museum of Anganwadi, ready for administrative machinery, will take millions of people due to consecutive holidays | आंगणेवाडीच्या महायात्रेसाठी दुकाने सजली, प्रशासकीय यंत्रणा सज्ज, सलग सुट्ट्यांमुळे लाखोंचा जनसमुदाय लोटणार

आंगणेवाडीच्या महायात्रेसाठी दुकाने सजली, प्रशासकीय यंत्रणा सज्ज, सलग सुट्ट्यांमुळे लाखोंचा जनसमुदाय लोटणार

googlenewsNext

- सिद्धेश आचरेकर 

मालवण : दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळख लाभलेल्या मालवण तालुक्यातील मसुरे आंगणेवाडीच्या श्री देवी भराडीची महायात्रा अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपली आहे. मंदिर परिसरात यात्रोत्सावाची तयारी गतिमानरित्या सुरु झाली आहे. स्थानिक मंडळ आणि प्रशासकीय यंत्रणांकडून यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी कंबर कसली आहे. व्यापारी बांधवांनी दुकाने थाटली असून यात्रेची सर्व प्रकारची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. जसजशी दुकाने सजायला लागली, तसतशी आंगणेवाडी परिसरात फुलून जात आहे. २७ जानेवारी रोजी होणा-या यात्रोत्सवापूर्वीच आंगणेवाडीत भक्तिमय वातावरण तयार झाले आहे. यावर्षी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन, सिंधु सरस महोत्सव, फ्लावर शो यासह सामाजिक संस्था व पक्षांकडूनही विविध सामाजिक उपक्रम, शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिर व मंदिर परिसरातील विद्युत रोषणाई व फुलांची आरास लक्षवेधी ठरणार आहे.  
आंगणेवाडी यात्रोत्सव प्रथमच जानेवारी महिन्यात होत असून शुक्रवारी प्रजासत्ताक दिन व त्यानंतर शनिवार व रविवार अशा सलग सुट्या आल्याने यावर्षी भाविक गर्दीचा उच्चांक गाठण्याची शक्यता आहे. विक्रमी गर्दी डोळ्यासमोर ठेवून स्थानिक ग्रामस्थ मंडळाने काटेकोरपणे नियोजन केले आहे. भाविकांना काही मिनिटातच भराडी देवीचे दर्शन व्हावे, यासाठी विविध मार्गांवरून स्वतंत्र रांगांची व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रोत्सवात भाविकांच्या सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य देण्यात येते. भाविकांनी शिस्तबद्ध दर्शन घेतल्यास कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.
यात्रोत्सवातील नियोजन अंतिम टप्प्यात आले असले तरी आयोजकांकडून त्रुटी दूर केल्या जात आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे तसेच पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे. यासह भाविकांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळासह अनेक सेवाभावी संस्थांचे स्वयंसेवक २४ तास कार्यरत राहणार आहेत. प्रशासकीय यंत्रणाकडून जातीनिशी यात्रोत्सवाचा आढावा घेतला जात आहे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासह पालकमंत्री, खासदार, आमदार यांनी आढावा घेतला आहे. आंगणेवाडी जोडणा-या रस्त्यांचेही डांबरीकरण पूर्ण झाले असून काही मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरु आहे.
आंगणेवाडी यात्रोत्सव म्हटला की निरनिराळी दुकाने, हॉटेल्स भाविकांच्या सेवेसाठी असतात. यासाठी व्यापारी बांधवाना दोन दिवसांसाठी मुबलक पाणीसाठा करून देण्यात येतो. पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा कामी येते. आरोग्याच्यादृष्टीनेही पाणी शुद्धीकरण करून व्यापारी बांधवाना देण्यात येत असल्याचे स्थानिक मंडळाचे अध्यक्ष नरेश आंगणे यांनी सांगितले. एसटी प्रशासनाकडून मालवण, कणकवली व मसुरे या तीन ठिकाणी बसस्थानकाची उभारणी करण्यात आली आहे. वीज वितरण कंपनीकडून व्यापाºयांना भूमिगत वीजपुरवठा केला जाणार आहे. आरोग्य विभागाच्यावतीनेही विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. यात्रोत्सव कालावधी २७ व २८ जानेवारी या कालावधीत होत असून नियोजनातील सर्व कामे पूर्णत्वाकडे जात असल्याचे दिसून येत आहे. यात्रेला तीन दिवस उरल्याने राजकीय पक्ष, महनीय व्यक्ती, संस्थांकडून डिजिटल फलक लावण्याचे काम युद्धपातळीवर सुरु झाले आहे. रस्त्याच्या दुतर्फा लागणारे जाहिरात फलकही आकर्षणाचा विषय ठरतात. महनीय व्यक्तींसाठी दोन हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आली असून देवीच्या दर्शनासाठी स्वतंत्र रांगाही व्यवस्था केली आहे. ज्येष्ठ नागरिक, अपंग यांच्यासाठीही स्वतंत्र रांग असणार आहे.  

सामाजिक उपक्रमांची रेलचेल
आंगणेवाडी यात्रोत्सवात लाखोंच्या संख्येने भाविक येतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून भाविकांना देवीचे दर्शन घेण्याबरोबरच अनेक प्रकारच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. सामाजिक संस्था तसेच राजकीय पक्षांकडून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. तर काही ठिकाणी आरोग्य शिबीर, नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. भाविकांचे मनोरंजन होण्यासाठी यात्रा कालावधीत विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सरबत वाटपाच्या कार्यक्रमापासून ते आरोग्य तपासणीपर्यंतचे अनेक सेवाभावी उपक्रम यात्रेत राबविले जातात. शिवसेनेच्यावतीने राज्यस्तरीय शुटींगबॉल स्पर्धाही राबविली जाते.

भक्तीतून प्लास्टिकमुक्तीचा संदेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वच्छ भारत संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाकडून  व्यापारी बांधवाना स्वच्छतेचे धडे दिले जाणार आहेत. 
भाविकांमध्ये प्लास्टिकमुक्तीची जनजागृती व्हावी यासाठी तब्बल ५० हजार कापडी पिशव्या भाविकांना वितरीत केल्या जाणार आहेत. तर व्यापारी बांधवांनी त्या-त्या वेळचा कचरा अन्यत्र न टाकता कचराकुंडीत टाकण्यासाठी १०० कचराकुंड्या उपलब्ध करून दिल्या आहेत. यात्रेचे औचित्य साधून स्वच्छतेचा नाराही भाविकांपर्यंत पोहोचविण्याचा भाजपा पदाधिकाºयांचा मानस आहे.

राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन
आंगणेवाडी यात्रोत्सवात राज्य शासनाच्यावतीने राज्यातील दुसरे भव्य कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. स्थानिक शेतकºयांना शेती व्यवसाय करण्यासाठी चालना मिळावी या उद्देशाने हे प्रदर्शन साकारत असून भव्य मंडपाचेही काम अंतिम टप्प्यात आले आहे. राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आंगणेवाडी यात्रोत्सवातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यास किफायतशीर ठरेल, असा विश्वास आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाने व्यक्त केला आहे. व्यापारी बांधव, महिलांचे बचतगट तसेच कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल सहज शक्य आहे. 

Web Title: Shops to be organized for the museum of Anganwadi, ready for administrative machinery, will take millions of people due to consecutive holidays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.