शाळांनी उघडली दुकाने
By admin | Published: April 14, 2015 01:06 AM2015-04-14T01:06:40+5:302015-04-14T01:10:41+5:30
पालकांना भुर्दंड : प्रत्येक विद्यार्थ्यांच्या माथी महागड्या वह्या अन् पुस्तके
रत्नागिरी : अशासकीय मान्यताप्राप्त मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी आता शिकवणीबरोबरच वह्या - पुस्तके विकण्याची जणू दुकानेच थाटली आहेत. शाळेत प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या माथी वह्या पुस्तके मारून त्यातूनही पैसा उकळण्याचा धंदा शाळांनी सुरु केला आहे. त्यामुळे डोनेशन देताना वैतागलेल्या पालकांना आणखी एक भुर्दंड सोसावा लागत आहे.
पाल्याला खासगी शाळेमध्ये प्रवेश मिळवताना हजारो रुपये मोजावे लागत आहेत. त्यातच आता शाळांमधून दिल्या जाणाऱ्या वह्या, पुस्तकांसाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत. शाळेच्या नावाने वह्या छापून त्यांची विक्री केली जात आहे. गणवेश खरेदीसाठीही शाळा आपल्या मर्जीतील एखाद्या कापड व्यावसायिकाची नियुक्ती करतात. त्यामुळे पालकांना सक्तीने त्याच दुकानातून गणवेश खरेदी करावे लागतात. शूज खरेदीसाठीही विशिष्ट विक्रेता निश्चित केला जातो. त्यामुळे शैक्षणिक साहित्य, गणवेश, शूज विक्री ही शाळेतूनच केली जात आहे. त्यातूनही पैसे उकळण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे पालक वैतागले आहेत.
पाठ्यपुस्तके आणि वर्कबुक सक्तीने विद्यार्थ्यांच्या माथी मारतात. पुस्तकाच्या मूळ किमतीपेक्षा अधिक पैसे शाळा घेत आहेत. आता तर वह्या पुस्तकांच्या वेष्टनासह अन्य साहित्यांची विक्रीही शाळांनी सुरू केली आहे. बाजारातील किमतीपेक्षा अधिक किंमत पालकांना मोजावी लागत आहे.
सर्वशिक्षा अभियानांतर्गत १ ते ८ वर्गातील सर्व विद्यार्थिनी व मागासवर्गीय, अनुसूचित जाती जमातीतील विद्यार्थ्यांना दरवर्षी पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात येते. मराठी माध्यमाच्या एक लाख ६७ हजार ७६० विद्यार्थ्यांना, तर उर्दू माध्यमाच्या १३०९५ मिळून एकूण १ लाख ८० हजार ८५५ विद्यार्थ्यांना पुस्तकांचा यावर्षी लाभ मिळाला. जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील एकूण विद्यार्थीसंख्या ३ लाख ५२ हजार ६९६ असून, १ लाख ८० हजार ८५५ विद्यार्थ्यांना शासकीय पुस्तकांचा लाभ मिळतो. मात्र, १ लाख ७१ हजार ८४१ विद्यार्थ्यांना पुस्तके विकत घ्यावी लागतात. अनेक शाळा वह्या - पुस्तकांची अनधिकृत विक्री करून नफा मिळवत आहेत. त्याचा पालकांना दरवर्षी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. (प्रतिनिधी)