उपोषणाला अल्प प्रतिसाद
By admin | Published: October 16, 2015 10:02 PM2015-10-16T22:02:42+5:302015-10-16T22:13:17+5:30
बाराच जण सहभागी : माध्यमिक अध्यापक संघाच्या विविध मागण्या
सिंधुदुर्गनगरी : आपल्या विविध प्रलंबित दहा मागण्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्यावतीने शुक्रवारपासून जिल्हा परिषदेसमोर सुरु केलेल्या बेमुदत उपोषणाला अल्प प्रतिसाद दिसून आला. या संघटनेत शेकडो शिक्षक सामील असतानादेखील या उपोषणात केवळ १२ जणांनीच सहभाग घेतला.जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षणसेवक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत. याबाबत वारंवार लक्ष वेधूनही माध्यमिक शिक्षण प्रशासनाकडून दखल घेण्यात आलेली नाही. याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्यावतीने जिल्हा परिषद प्रशासनास निवेदन सादर करण्यात आले होते. तर त्यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत निर्णय घेण्यासाठी १३ आॅक्टोबरपर्यंतची मुदत दिली होती. मात्र, या मुदतीत कोणतीही दखल न घेतल्याने माध्यमिक अध्यापक संघाच्यावतीने जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानुसार शुक्रवारपासून उपोषणास सुरुवात केली आहे. मात्र जिल्ह्यात माध्यमिककडे शेकडो शिक्षक कार्यरत असूनही या बेमुदत उपोषणाला अत्यल्प प्रतिसाद दिसून आला. या उपोषणाला केवळ १२ शिक्षक सहभागी झाले होते.
आजचे उपोषण माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष गुरुनाथ पेडणेकर यांच्या गैरहजेरीत कार्याध्यक्ष लक्ष्मण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली सुरु झाले आहे. यामध्ये भिकाजी मगदूम, मारुती मनमाडकर, प्रकाश कानुरकर, राजन सावंत, संगीता खडसे यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
प्रमुख मागण्या : आश्वासनाअंती उपोषण स्थगित
सेवाज्येष्ठ शिक्षकांवर पदोन्नती देताना अन्याय झाला आहे, सन २०१५-१६ च्या त्रैमासिक सभेचे आयोजन नाही. शिक्षणाधिकाऱ्यांच्या मान्यतेअभावी कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन रखडले आहे.
वेतन देण्यास टाळाटाळ केली जाते असे विविध प्रश्न शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भेडसावत आहेत.
हे सर्व प्रलंबित प्रश्न तत्काळ सोडवावेत यासाठी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाने शुक्रवारपासून बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष गुरुनाथ पेडणेकर हे विद्यमान जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती आहेत. तरीही जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडे माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आपल्या मागण्यांसाठी झगडावे लागत आहे.
विविध मागण्यांसाठी माध्यमिक अध्यापक संघाच्यावतीने बेमुदत उपोषणास सुरुवात करण्यात आली होती.
दरम्यान, या उपोषणकर्त्यांची जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत व उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी भेट घेत प्रलंबित मागण्या २६ आॅक्टोबरपर्यंत पूर्ण करू असे आश्वासन दिल्यामुळे सुरु केलेले बेमुदत उपोषण स्थगित करण्यात आले.
२६ आॅक्टोबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आमरण उपोषण सुरु करू अशी माहिती संघटनेचे कार्याध्यक्ष लक्ष्मण पावसकर यांनी दिली.