विशेष घटक योजनेच्या घरघंटीसाठी अल्प प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 01:34 PM2019-03-08T13:34:36+5:302019-03-08T13:39:12+5:30
महिला व बाल कल्याण विभागाकडे विशेष घटक योजनेअंतर्गत घरघंटीसाठी ३ लाख रुपये अनुदान प्राप्त आहे. यासाठी २७ प्रस्तावांचे उद्दिष्ट होते. मात्र, आतापर्यंत १० प्रस्ताव आले असून त्यातील ६ प्रस्ताव परिपूर्ण आहेत. त्यामुळे अजून २१ परिपूर्ण प्रस्तावांची आवश्यकता आहे, अशी माहिती गुरुवारी झालेल्या महिला व बाल कल्याण समिती सभेत देण्यात आली.
सिंधुदुर्गनगरी : महिला व बाल कल्याण विभागाकडे विशेष घटक योजनेअंतर्गत घरघंटीसाठी ३ लाख रुपये अनुदान प्राप्त आहे. यासाठी २७ प्रस्तावांचे उद्दिष्ट होते. मात्र, आतापर्यंत १० प्रस्ताव आले असून त्यातील ६ प्रस्ताव परिपूर्ण आहेत. त्यामुळे अजून २१ परिपूर्ण प्रस्तावांची आवश्यकता आहे, अशी माहिती गुरुवारी झालेल्या महिला व बाल कल्याण समिती सभेत देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या नाथ पै सभागृहात नियमित सभापती पल्लवी राऊळ यांच्या अनुपस्थित सायली सावंत यांच्या अध्यक्षतेखाली हि सभा झाली. यावेळी सचिव प्रणवकुमार चटलवार, सदस्य माधुरी बांदेकर, संपदा देसाई, वर्षा कुडाळकर, श्वेता कोरगांवकर, पल्लवी झिमाळ, राजलक्ष्मी डीचवलकर यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीला पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या पत्रकारांचा अभिनंदन ठराव सौ डीचवलकर यांनी मांडला.
यावेळी विशेष घटक घरघंटी विषयावरून संपदा देसाई व सभाध्यक्षा सावंत यांच्यात गरमागरम चर्चा झाली. मागील सभेत आपण सादर केलेले प्रस्ताव मंजुरी दिलेल्या सभेनंतर सादर करण्यात आले होते, हे प्रशासनाने किंवा सभापतींनी सांगितले नाही. त्यामुळे दोडामार्ग तालुक्याचा एकही प्रस्ताव नसल्याचे मी सांगितले होते, असे देसाई यांनी सांगितले.
प्रश्न विचारला म्हणजे जिल्हा परिषदेची बदनामी केली, असे होत नाही. याकडे लक्ष वेधत देसाई यांनी त्यानंतर आपल्या विरोधात बातमी देण्यात आल्याचे सांगितले. यावर सभाध्यक्षांनी त्यांचे आलेले सर्व प्रस्ताव घ्या, असे आदेश दिले. तर यानंतर आलेले सर्व प्रस्ताव पुढील आर्थिक वर्षात घ्यावेत, अशी मागणी सौ देसाई यांनी केली.
महिला व बाल कल्याणच्या ५७ घरघंटी, १८१ शिलाई मशीन, ४१२ सायकल अशा प्रस्तावांना मंजुरी दिल्याचे प्रशासनाने सांगितले. यावेळी दोन वर्षे प्रशिक्षण निविदा कोण घेत नसल्याने जिल्ह्यातील महिला-मुलींना प्रशिक्षण मिळत नाही. त्यामुळे हि प्रशिक्षणे तालुकास्तरावर घेण्याचा ठराव घेण्याचे सभाध्यक्षांनी सूचित केले.
माधुरी बांदेकर यांनी अंगणवाडी सेविकांना रजिस्टर कोण पुरविते ? असा प्रश्न केला असता सचिव चटलवार यांनी येत्या दोन महिन्यात अंगणवाडीतील रजिस्टर नोंद बंद होणार आहे. सर्व अंगांवाड्यांना शासन मोबाईल पुरविणार आहे. त्यानंतर सर्व नोंदी मोबाईलमध्येच होणार आहेत, असे सांगितले.
पोषण पंधरवडा
शासन महिला व किशोरवयीन मुलींसाठी ८ ते २२ मार्च या कालावधीत पोषण पंधरवडा साजरा करीत आहे. यानिमित्त शासनाने पंधरा दिवसाच्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवून दिली आहे. ग्रामसभा, मेळावे, पोषण रॅली, सायकल रॅली, रक्तक्षय तपासणी, समूह सभा, जनजागृती कार्यक्रम आदी उपक्रम यानिमित्त राबविले जाणार आहेत, असे यावेळी चटलवार यांनी सांगितले.