नारायण राणेंवर किरीट सोमय्यांनी केलेले आरोप खरे मानायचे का? दीपक केसरकरांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 11:10 AM2022-02-18T11:10:56+5:302022-02-18T11:13:28+5:30
Deepak Kesarkar : किरीट सोमय्यांच्या पत्रकार परिषदेला समर्थन देण्यासाठी पत्रकार परिषद घेता, मग किरीट सोमय्यांनी त्यावेळी तुमच्यावर केलेले आरोप खरे मानायचे का? असा सवाल केसरकर यांनी उपस्थित केला.
सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या यांचे समर्थन करताना शिवसेना नेते संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांच्यावर जोरदार टीका केली होती. या टीकेचा शिवसेना नेते आणि माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी समाचार घेतला आहे. किरीट सोमय्यांच्या पत्रकार परिषदेला समर्थन देण्यासाठी पत्रकार परिषद घेता, मग किरीट सोमय्यांनी त्यावेळी तुमच्यावर केलेले आरोप खरे मानायचे का? असा सवाल केसरकर यांनी उपस्थित केला.
सुशांत सिंग प्रकरण हे सीबीआयकडे आहे. ती तुमचीच तपास यंत्रणा आहे. मग जो तपास केला, तो सीबीआय जाहीर का करत नाही. ज्यांचा या प्रकरणाशी कोणताच संबध नाही. त्यांच्यावर आरोप करायचे बदनामी करायची. राणे ज्यांच्यामुळे घडले ज्या कुटुंबामुळे ते मुख्यमंत्री झाले त्यांच्या बद्दल बोलताना जिभ थोडीतरी चाचरली पाहिजे, असे म्हणत दीपक केसरकर यांनी नारायण राणेंवर निशाणा साधाला.
याचबरोबर, संजय राऊत तुमच्याबद्दल बोलले होते का? मग तुम्ही का बोलता, लोकसभेत तुम्हाला उत्तर देता येत नाही मग इथे येऊन का बोलता? जर किरीट सोमय्याच्या पत्रकार परिषदेला पुष्टी देण्यासाठी पत्रकार परिषद घेता. मग तुमच्यावर किरीट सोमय्यांनी त्यावेळेस केलेले आरोप खरे मानायचे का? तुम्ही त्यावेळेस सामोरे न जाता लोटांगण घालून तुम्ही भाजपामध्ये गेलात, असे दीपक केसरकर म्हणाले.
किरीट सोमय्या कोणाबद्दल बोलले, संजय राऊत कोणाबद्दल बोलले, त्यात तुम्ही का उडी घेता? असा प्रश्न दीपक केसरकर यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच, तुम्हाला बोलायचचं असेल तर लोकसभेत चांगला परफॉर्मन्स दाखवा असा टोला दीपक केसरकर यांनी नारायण राणेंना लगावला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यात चांगले रस्ते आणले. नितीन गडकरी यांच्याकडील खाते राणेंना दिले. मात्र राणेंनी हे खाते मिळालेले असताना त्यांनी काही केले नाही. टीका करण्यासाठी हे खाते दिले आहे का? असा सवाल दीपक केसरकर यांनी उपस्थित केला आहे.