सिंधुदुर्ग उपवनसंरक्षकाना कारणे दाखवा नोटीस, मुख्यवनसंरक्षक कार्यालयांची दिशाभूल भोवली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2018 11:15 PM2018-01-20T23:15:28+5:302018-01-20T23:16:09+5:30
कणकवली वनपरिक्षेत्राचे निलंबित कर्मचारी कृष्णा सावंत प्रकरणात विभागीय चौकशी अहवाल प्राप्त होऊनही त्यावर कोणतीही कारवाई न करणे तसेच मुख्यवनसंरक्षक कार्यालयास चुकीची माहिती देऊन घाईगडबडीत चुकीचे आदेश प्रारित करून घेतल्या प्रकरणी कोल्हापूर वनपरिक्षेत्राचे मुख्यवनसंरक्षक अरविंद पाटील यांनी सिंधुदुर्ग उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
सावंतवाडी : कणकवली वनपरिक्षेत्राचे निलंबित कर्मचारी कृष्णा सावंत प्रकरणात विभागीय चौकशी अहवाल प्राप्त होऊनही त्यावर कोणतीही कारवाई न करणे तसेच मुख्यवनसंरक्षक कार्यालयास चुकीची माहिती देऊन घाईगडबडीत चुकीचे आदेश प्रारित करून घेतल्या प्रकरणी कोल्हापूर वनपरिक्षेत्राचे मुख्यवनसंरक्षक अरविंद पाटील यांनी सिंधुदुर्ग उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यावर सात दिवसात उत्तर द्या अन्यथा वरिष्ठ कार्यालयास आपला अहवाल पाठविण्यात येणार असल्याचेही पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
कणकवली वनपरिक्षेत्राचे वनकर्मचारी कृष्णा सावंत यांना वैभववाडी तालुक्यातील एका मालकी प्रकरणात अवैध वृक्षतोड केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले होते. या कारवाई विरोधात सावंत यांनी मॅट वनविभागाच्या न्याय प्राधिकरणात धाव घेतली. या प्रकरणी विभागीय चौकशीही प्रस्तावित करण्यात आली होती. या चौकशीचा अहवाल २२ मार्च २०१७ ला प्राप्त झाला होता. पण त्यावर कोणतीही कारवाई सिंधुदुर्ग वनविभागाने केली नाही. हा अहवाल तसाच दाबून ठेवण्यात आला होता.
याच काळात कृष्णा सावंत हे वनकर्मचारी म्हणून सेवानिवृत्त झाले होते. त्यांना सेवानिवृत्तीचा कोणताही लाभ मिळत नव्हता. म्हणून या विरोधात त्यांनी मॅटकडे पुन्हा धाव घेतली होती. त्यावर मॅट तत्काळ निर्णय घ्या, असे आदेश कोल्हापूर व सिंधुुदुर्ग वनविभागाला दिले होते. पण याकडे सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी दुर्लक्ष केले. तसेच मॅटने अंंितम आदेश देताच यावर चुकीची माहिती न्यायालयाला देण्यात आली होती. यामुळे मुख्यवनसंरक्षक अरविंद पाटील व सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांना मॅटने दंड ठोठावला होता.
या प्रकरणी मुख्यवनसंरक्षक कार्यालयाने माहिती घेतली असता यात सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण वनकर्मचारी निलंबन प्रकरण हाताळताना अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे लक्षात आल्याने मुख्यवनसरंक्षकांनी तत्काळ या प्रकरणी चव्हाण यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यात संबंधित कर्मचाºयांवर शिक्षा लादण्यासाठी प्रयत्न करणे, मुख्यवनसंरक्षक कार्यालयाची दिशाभूल करणे तसेच आपल्याकडून विभागीय चौकशी अहवालावर कारवाई करण्यास विलंब होणे तसेच कार्यालयाची दिशाभूल करणे आदी बाबतीत सात दिवसांच्या आत कार्यालयास उत्तर देणे तसेच समाधानकारक उत्तर न मिळाल्यास आपल्याविरूध्द शिस्तभंगाची कारवाई करणेबाबत वरिष्ठ कार्यालयास प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे, असेही या पत्रात म्हटले आहे.
हे पत्र सिंधुदुर्ग वनविभागास चार दिवसांपूर्वीच प्राप्त झाले आहे. मात्र यावर उपवनसंरक्षक यांनी अद्यापपर्यंत उत्तर दिले नाही. पण ते लवकरच उत्तर देतील, असे कोल्हापूर येथील वनकार्यालयाने स्पष्ट केले आहे.