संबंधितांना कारणे दाखवा
By admin | Published: December 19, 2014 10:01 PM2014-12-19T22:01:19+5:302014-12-19T23:30:07+5:30
स्नेहलता चोरगे : जिल्हा परिषद महिला बालविकास समिती सभा
सिंधुदुर्गनगरी : अंगणवाडी सेविकांमार्फत महिला व बालविकास विभागाकडे देण्यात येणारा मासिक प्रगती अहवाल या विभागाकडे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या व प्रशासनास वेठीस धरणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजवावी, असे सक्त आदेश महिला बालविकास सभापती स्नेहलता चोरगे यांनी दिले.
जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास समितीची सभा सभापती स्नेहलता चोरगे यांच्या अध्यक्षतेखाली येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाली. यावेळी समिती सदस्य वंदना किनळेकर, वृंदा सारंग, श्रावणी नाईक, रत्नप्रभा वळंजु, रूक्मिणी कांदळगावकर, समिती सचिव सोमनाथ रसाळ, अधिकारी, खातेप्रमुख, तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.
पेशावर येथे सैनिकी शाळेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १२८ विद्यार्थ्यांसह १६० जणांची हत्या करण्यात आली होती. या भ्याड हल्ल्याचा समितीच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला व मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
शासन निर्णय होऊनदेखील पगारवाढ न दिल्याने अंगणवाडी सेविकांनी अहवालबंद आंदोलन छेडायला सुरूवात केली आहे. मात्र असे असले तरी सिंधुदुर्ग जिल्हा वगळून इतर सर्व जिल्ह्याचा मासिक प्रगती अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे. या जिल्ह्याचा विद्यार्थ्यांच्या मासिक प्रगतीचा अहवाल प्राप्त न झाल्याने शासनाकडून याची विचारणा झाली असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी दिली. मानधनवाढीचा निर्णय झाला असला तरी निधीची तरतूद नसल्याने वाढीव मानधन आपण दिलेले नाही. मात्र, डिसेंबरअखेर निधी प्राप्त होताच फरकासह सर्व वाढीव मानधन देण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधितांचा मासिक अहवाल आवश्यक आहे. अहवाल न दिल्याने कामाची गंभीरता नसल्याचे दिसून येते. कणकवली, वैभववाडी, मालवण या तालुक्यांचा मासिक प्रगती अहवाल प्राप्त झाला आहे तर उर्वरित तालुक्यांचा अहवाल प्राप्त झाला नाही. त्यामुळे कामात अनियमितता नसल्याने संबंधित कर्मचाऱ्यांवर कारणे दाखवा नोटीसा पाठवा, असे आदेश सभापती चोरगे यांनी अधिकाऱ्यांना दिले. (प्रतिनिधी)
कुपोषण मुक्तीसाठी अभियान राबविणार
सावंतवाडी तालुक्याने सुरू केलेले कुपोषणमुक्ती अभियान अन्य सर्व तालुक्यांमधून राबविण्याचे आदेशही चोरगे यांनी दिले. सावंतवाडी बालविकास प्रकल्प अधिकारी मोहन भोई यांच्या योग्य नियोजनातून हे अभियान साकारत असल्याने संबंधितांचे अभिनंदन केले.
५२ विद्यार्थ्यांना हृदयविकाराचा आजार
आरोग्य विभागाकडून करण्यात आलेल्या शालेय आरोग्य तपासणीत ९९ विद्यार्थी हे दुर्धर आजाराने पीडित असल्याचे निष्पन्न झाले असून त्यातील तब्बल ५२ विद्यार्थी हे हृदयविकारग्रस्त असल्याची धक्कादायक बाब आरोग्य विभागाच्या अहवालावरून उघड झाली आहे. तसेच १४ मतिमंद विद्यार्थी, कॅन्सरचे ४ विद्यार्थी, अस्थिव्यंगचे ४ विद्यार्थी, बहुविकलांग ५ विद्यार्थी व इतर १३ असे एकूण ९९ विद्यार्थ्यांना दुर्धर आजार झाला आहे. यातील ८ विद्यार्थ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याची माहितीही यावेळी आरोग्य विभागाकडून देण्यात आली तर इतर औषधोपचाराखाली ठेवण्यात आले आहेत.