बंडखोरांना कारणे दाखवा नोटीस
By admin | Published: April 29, 2015 11:08 PM2015-04-29T23:08:05+5:302015-04-30T00:26:53+5:30
सतीश सावंत : जिल्हा बँक निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सर्व जागा जिंकेल
कणकवली : काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाने आघाडी करून जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी संकल्प सिद्धी पॅनेल तयार केले आहे. या निवडणुकीत बंडखोरी करून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या प्रदीप ढोलम, सुभाष मडव, बाबल आल्मेडा व सुगंधा साटम, आशिष परब या पाच जणांना काँग्रेस पक्षाच्यावतीने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे, असे सांगतानाच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा विचार मानणाऱ्या मतदारांनी या पाच जणांना मतदान करू नये, असे आवाहन काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी केले.येथील काँग्रेस संपर्क कार्यालयात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सावंत पुढे म्हणाले, ५ मे रोजी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. संकल्पसिद्धी पॅनेलची एक जागा बिनविरोध झाली आहे.
काँग्रेस नेते नारायण राणे, आमदार नीतेश राणे, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उर्वरित १८ जागांवरही काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येतील. विरोधक काँग्रेस पक्ष कमकुवत झाल्यानेच त्यांनी राष्ट्रवादीशी आघाडी केली अशी टीका करीत आहेत.
मात्र, शिवसेना-भाजपासह सहा गट एकत्र येवूनही त्यांना या निवडणुकीसाठी १९ उमेदवार मिळू शकले नाहीत. त्यामुळे नेमके अध:पतन कोणाचे झाले आहे हे दिसून येते. उमेदवारी अर्ज भरण्याची ज्यांना माहिती नाही ते जिल्हा बँक काय चालविणार? असा प्रश्न निर्माण होतो, अशी टीकाही सावंत यांनी यावेळी केली.
राजन तेली यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपामध्ये नेमके काय चालले आहे ते प्रथम पहावे आणि त्यानंतरच वक्तव्य करावे. जिल्हाध्यक्ष या नात्याने यापूर्वीही अनेक पदाधिकाऱ्यांवर पक्षांतर्गत कारवाई करून राजीनामे घेण्याची हिंमत मी दाखविली आहे. त्यामुळे तेली यांनी त्याविषयी वक्तव्य करू नये.
ते पुढे म्हणाले, केंद्रामध्ये सत्ता येवून एक वर्षाचा कालावधी उलटला आहे. तर राज्यातील सत्तेला सहा महिन्यांचा कालावधी होऊनही जनतेचे प्रश्न सुटू शकलेले नाहीत. लोकसभा तसेच विधानसभेच्या निवडणुकीत मते मागताना अनेक आश्वासने शिवसेना-भाजपाच्या नेत्यांनी दिली होती. ती पूर्ण होऊ शकलेली नाहीत. वाळू व्यावसायिकांवर भाजपा-शिवसेनेमुळेच कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. होड्यांचे सील तोडणार असे सांगण्याची वेळ आमदारांवर आली आहे. मात्र, या समस्येला तेच कारणीभूत
आहेत. (वार्ताहर)
वाळू व्यावसायिकांच्या समस्येला केसरकर, नाईक कारणीभूत
वाळू व्यावसायिकांच्या समस्या सोडविणार तसेच इको सेन्सिटीव्हचे भूत उतरविणार असल्याचे सांगत शिवसेना-भाजपच्या नेत्यांनी निवडणुकीत मते मागितली. मात्र केंद्रात तसेच राज्यात सत्ता येवूनही त्यांना हे शक्य झालेले नाही. वाळू व्यावसायिकांच्या समस्यांसाठी पालकमंत्री दीपक केसरकर व आमदार वैभव नाईकच कारणीभूत आहेत. सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागल्यास काँग्रेस पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सावंत यांनी यावेळी दिला.
पालकमंत्र्यांचा प्रशासनावर वचक नाही
जिल्ह्याच्या राजकारणात पालकमंत्री दीपक केसरकर यांचा कोणताही प्रभाव दिसून येत नाही. पालकमंत्र्यांना पोलीस संरक्षण उपलब्ध होत नसेल तसेच पोलीस त्यांचे ऐकत नसतील तर प्रशासनावर त्यांचा वचक नसल्याचेच स्पष्ट होत आहे. दीपक केसरकर अगतिक झाले असून त्यांचा प्रशासनावर अंकुश नसल्याने जनतेचे प्रश्न ते सोडवू शकत नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेऊन कॅबिनेट दर्जाचा पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी द्यावा, अशी आमची मागणी असल्याचे सावंत यांनी यावेळी सांगितले..
फौजदारी गुन्हा दाखल करणार
३१ मे रोजी निवडणूक
मालवण, कणकवली, वेंगुर्ले, कुडाळ, देवगड या पाच खरेदी-विक्री संघांची निवडणूक ३१ मे रोजी होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ५ मे पर्यंत आहे. काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करू इच्छिणाऱ्यांनी २ मे पर्यंत तालुकाध्यक्षांकडे आपले अर्ज दाखल करावेत असे आवाहन सावंत यांनी यावेळी केले.
हिंमत दाखविण्यास सक्षम
बबन राणे व महेश सारंग हे आमच्या पक्षात आहेत. त्यांची कामगिरी पाहून त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत दाखविण्यासाठी मी सक्षम आहे. त्यामुळे राजन तेली यांनी त्याबाबतचा सल्ला देण्याची गरज नाही.