गावात येण्यास मज्जाव करणाऱ्यांना जागा दाखवा, परशुराम उपरकर यांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 11:30 AM2021-01-14T11:30:00+5:302021-01-14T11:31:23+5:30
Parshuram Upkar Sindhudurg- कोरोनाच्या कालावधीत मुंबईहून गावी येणाऱ्या चाकरमान्यांना गावात येण्यास मज्जाव करणारे, तसेच गणेशोत्सव कालावधीतही चाकरमान्यांनावर दबाव आणणाऱ्या गाव पातळीवरील प्रस्थापितांना त्यांची जागा दाखविण्याची हीच वेळ आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत अशा प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केले आहे.
कणकवली : कोरोनाच्या कालावधीत मुंबईहून गावी येणाऱ्या चाकरमान्यांना गावात येण्यास मज्जाव करणारे, तसेच गणेशोत्सव कालावधीतही चाकरमान्यांनावर दबाव आणणाऱ्या गाव पातळीवरील प्रस्थापितांना त्यांची जागा दाखविण्याची हीच वेळ आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत अशा प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केले आहे.
याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मनसेने कोरोना काळात सातत्याने चाकरमान्यांची बाजू घेतली. गणेशोत्सवानिमित्त गावी येणाऱ्या चाकरमान्यांना सात दिवसांचे क्वारंटाईन करा, रॅपिड चाचणी करून त्यांना गावात प्रवेश द्या, असे आवाहन सर्वप्रथम मनसेनेच केले होते. मात्र, गावी आलेल्या चाकरमान्यांना त्रास देण्याचे काम तत्कालीन सरपंच, गावपुढारी यांनी केले.
गणेशोत्सव कालावधीत अनेक चाकरमान्यांना गावागावांमध्ये मज्जाव करण्यात आल्याने त्यांना मुंबईतच गणेशोत्सव साजरा करावा लागला. कोकणात विशेषत: सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. चाकरमानी हा सण साजरा करण्यासाठी गावी येत असतो. मात्र, या चाकरमान्यांना गावात येण्यास प्रस्थापित राजकारण्यांनी विरोध केला
चाकरमानी येण्यास मनसेने घेतला होता पुढाकार
गणेशोत्सव कालावधीसाठी शासनाकडून चाकरमान्यांकरिता निकष निर्धारित करण्याअगोदरच सरपंच संघटनेच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर नियमावली तयार करून चाकरमान्यांना आडकाठी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. चाकरमानी आणि त्यांचे नातेवाईक यांची मने कलुषित करण्याचा हा प्रयत्न होता. अशावेळी चाकरमानी गावात यावेत, यासाठी मनसेने सर्वप्रथम पुढाकार घेतला होता.
आज मनसेने काही ठरावीक उमेदवार उभे केले असले तरी ग्रामपंचायतींच्या कारभारावर लक्ष आणि नियंत्रण ठेवण्याचे काम ते करणार आहेत. त्यामुळे मतदारांनी या प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवून देत मनसेच्या उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहनही उपरकर यांनी या पत्रकातून केले आहे..