नेत्रदानातून दृष्टिहीनांना जग दाखवा
By admin | Published: October 7, 2016 09:41 PM2016-10-07T21:41:19+5:302016-10-08T00:02:48+5:30
रवींद्र सावळकर : बांद्यात पाटेश्वर मंडळाचा नेत्रदान अभियानास प्रारंभ
बांदा : आज समाजात कित्येक लोक हे दृष्टिहीन असून, आपल्या नेत्रदानामुळे तेही सुंदर सृष्टी पाहू शकतात. मात्र, याविषयी समाजात जनजागृती होणे हे महत्त्वाचे आहे. पाटेश्वर नवरात्र मंडळाने मरणोत्तर नेत्रदानाचा केलेला संकल्प हा खरोखरच कौतुकास्पद असून, समाजातील प्रत्येक डोळस व्यक्तीने ‘मरावे परी नेत्ररुपी उरावे’ या उक्तीप्रमाणे मरणोत्तर नेत्रदानात सहभागी व्हावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी रवींद्र सावळकर यांनी येथे केले.
बांदा आळवाडा येथील श्री पाटेश्वर सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाच्यावतीने आयोजित मरणोत्तर नेत्रदान संकल्प अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी सावळकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, सावंतवाडीचे नायब तहसीलदार शशिकांत जाधव, माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत, पंचायत समिती सदस्या श्वेता कोरगावकर, मंडळ अधिकारी उदय दाभोलकर, सरपंच मंदार कल्याणकर, तलाठी किरण गजीनकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप गीते, उपसरपंच बाळा आकेरकर, डेगवे उपसरपंच मधुकर देसाई, आदी मान्यवर उपस्थित होते. मंडळाने विविध सामाजिक कार्यक्रम राबविण्याची परंपरा यावर्षीही कायम ठेवली आहे. याआधी रस्ता सुरक्षा जनजागरण अभियान, स्त्री भू्रणहत्या विरोधात बेटी बचाओ जनजागरण अभियान असे उपक्रम राबविले आहेत.
यावर्षी ‘नेत्रदान हे श्रेष्ठदान’ हा संकल्प हाती घेऊन मंडळातर्फे मरणोत्तर नेत्रदान हा संकल्प करण्यात आला. १0६ हून अधिक दात्यांनी नेत्रदानासाठी प्रतिसाद दिला आहे. यावेळी बांदा शहरातून पदयात्रा काढून नेत्रदानाबाबत समाज जनजागृती करण्यात आली. या पदयात्रेत बांदा शहरातील व्ही. एन. नाबर, खेमराज हायस्कूल व गोगटे-वाळके महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी विविध फलक हाती घेऊन तसेच घोषवाक्यांच्या साहाय्याने समाजाला या संकल्पनेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
मंडळाचे अध्यक्ष प्रीतम हरलमकर यांनी स्वागत केले. अन्वर खान यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष किशोर साळगावकर, सचिव प्रसाद केसरकर, ओंकार मालवणकर, मंगलदास साळगावकर, सचिन नाटेकर, माजी सरपंच अपेक्षा नाईक, ग्रामपंचायत सदस्य हुसेन मकानदार, लक्ष्मी सावंत, जावेद खतीब, बाळु सावंत, चित्रा भिसे, साईराज साळगावकर, आदींसह बहुसंख्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)