‘सी-वर्ल्ड’चे श्राद्ध; ३५ जण ताब्यात
By Admin | Published: September 30, 2016 11:27 PM2016-09-30T23:27:55+5:302016-10-01T00:21:00+5:30
वायंगणीवासीयांचे आंदोलन : परवानगी न घेतल्याने पोलिसांची कारवाई
आचरा : विरोध कायम असूनही शासन कोणतीच दखल घेत नसल्याने शुक्रवारी सर्वपित्री अमावास्येला वायंगणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ‘सी-वर्ल्ड’ प्रकल्पाचे श्राद्ध घालण्यास प्रारंभ करताच पोलिसांनी त्यांचे आंदोलन बेकायदेशीर असल्याचे सांगून त्यांना ताब्यात घेतले. या प्रकल्पाला असलेला विरोध दर्शविण्यासाठी अशोक दुखंडे, प्रताप सावंत, पंचायत समितीचे सदस्य उदय दुखंडे, प्रफुल्ल माळकर यांच्यासह ३५ ग्रामस्थांनी या प्रकल्पाचे श्राद्ध घालण्यास प्रारंभ करताच त्यांना आचरा पोलिसांनी ताब्यात घेत पोलिस ठाण्यात नेले आणि प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून दिले.
या प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी ग्रामस्थांनी १५ आॅगस्टला उपोषण केले होते. त्या उपोषणाची शासनाने कोणतीच दखल घेतली नाही. त्यामुळे शुक्रवारी सर्वपित्री अमावास्येदिनी या प्रकल्पाचे श्राद्ध घालण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला होता. त्यानुसार सकाळी १० वाजल्यापासून वायंगणी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उदय दुखंडे, प्रफुल्ल माळकर, मंगेश आंगणे, राजन वराडकर, ब्रह्मनाद टिकम, मनोहर टिकम, रणजित राणे, संतोष दुखंडे, संतोष कदम, विलास केरकर, अनिल महाजन, विनायक खोत, प्रशांत सावंत, संतोष सावंत यांच्यासह ५० ते ६० ग्रामस्थ जमा झाले होते.
यावेळी वायंगणी ग्रामपंचायतीसमोर ग्रामस्थांनी श्राद्ध घालण्यास सुरुवात करताच पोलिस उपनिरीक्षक विनायक चव्हाण यांनी हे आंदोलन बेकायदा असल्याचे सांगत या सर्वांना ताब्यात घेतले आणि त्यांची रवानगी आचरा पोलिस ठाण्यात केली.
पोलिसांनी कारवाई करताच आंदोलकांनी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर व आमदार वैभव नाईक यांचा जाहीर निषेध केला. या दोघांचाही या प्रकल्पाला पाठिंबा असल्यामुळे त्यांना आगामी निवडणुकीत धडा शिकविण्याचा व आता यापुढे कोणासोबतही चर्चा न करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला.
कॉँग्रेसचा या प्रकल्पाला सुरुवातीपासून पाठिंबा आहे. आपल्या हितसंबंधियांचे हित जपण्यासाठी कॉँग्रेसची धडपड सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. (वार्ताहर)
प्रकल्पाला सेनेने पाठिंबा दिल्यास पक्षाचा राजीनामा : दुखंडे
आमदार वैभव नाईक यांनी आपली भूमिका जाहीर केली असली तरी पक्षाची भूमिका काय? हे समजून घेण्यासाठी आपण शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांची भेट घेणार असल्याचे आणि या प्रकल्पाला पक्षाचा पाठिंबा असेल तर आपण आपल्या पदाचा व पक्षाचा राजीनामा देऊन ग्रामस्थांसोबत राहणार असल्याचे उदय दुखंडे यांनी जाहीर केले.
‘सी-वर्ल्ड’ प्रकल्पाला वायंगणी ग्रामस्थांचा कडाडून विरोध असूनही त्याची अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न शासनाकडून केले जात आहेत. त्यातच शिवसेनेचे आमदार, खासदार या प्रकल्पाच्या बाजूने उभे राहिल्याने ग्रामस्थ संतापले आहेत.
पोलिसांना हाताशी धरून गृहराज्यमंत्री दीपक केसरकर हे आंदोलन दडपत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. शिवाय या प्रकल्पाला जाहीर पाठिंबा देणारे आमदार वैभव नाईक यांचा उदय दुखंडे व ग्रामस्थांनी निषेध केला.