खड्डेमय रस्त्याचे श्राद्ध घालून निषेध

By admin | Published: August 14, 2016 11:59 PM2016-08-14T23:59:13+5:302016-08-14T23:59:13+5:30

सव्वा वर्षापासून डागडुजीची प्रतीक्षा : प्रशासन, नगरसेवकांचे दुर्लक्ष

Shraddha Prohibition of the paved road | खड्डेमय रस्त्याचे श्राद्ध घालून निषेध

खड्डेमय रस्त्याचे श्राद्ध घालून निषेध

Next

मालवण : शहरातील अनेक रस्ते भुयारी गटार योजनेच्या अर्धवट कामांमुळे खोदलेल्या स्थितीत आहेत. धुरीवाडा येथील फोवकांडा पिंपळ ते साईमंदिर रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. रस्त्यांवरील गटारे व खड्डे पडल्याने अनेक अपघातही घडले आहेत. याबाबत स्थानिक नागरिकांनी पालिका तसेच नगरसेवकांकडे पाठपुरावा करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी पालिकेचा निषेध नोंदवत खड्डेमय रस्त्यांचेच श्राद्ध घालून पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
गणेश चतुर्थी उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशमूर्तींची ने-आण याच मार्गावरून होत असल्याने गणेश चतुर्थीपूर्वी रस्ता करण्यात यावा. अन्यथा नागरिक ‘भीक आंदोलन’ छेडून या रस्त्याचे काम करतील, असा इशारा आंदोलनकर्ते अरविंद मोंडकर यांनी दिला आहे.
यावेळी श्राद्ध आंदोलनात अरविंद मोंडकर, रेश्मा शिगले, प्राजक्ता गांगनाईक, समीर शेख, अनिकेत आचरेकर, सुबोध गावकर, माधुरी कांदळगावकर, मनीषा पारकर, मेघा जाधव, साजीया शेख, रवींद्र मयेकर, आबा मसूरकर, कुशल आचरेकर, गौरी कुमामेकर, शोभा चिंदरकर, मारुती आचरेकर, सुमन कुमठेकर, वसुंधरा तोंडवळकर, जितेंद्र मेस्त्री, बाबू मंडलिक, आदी नागरिकांनी सहभाग दर्शवत पालिकेचा निषेध नोंदवला.
पालिकेविरोधात प्रतीकात्मक श्राद्ध
फोवकांडा पिंपळ ते साईमंदिर मार्गावरील खोदलेल्या रस्त्याला सव्वा वर्ष होऊन गेले. गतवर्षी गणेशमूर्ती याच धोकादायक रस्त्यावरून नेण्यात आल्या. त्यानंतर पालिका तसेच स्थानिक नगरसेवकांकडे या रस्त्याचा प्रश्न मांडण्यात आला. मात्र, त्याकडे दुर्लक्षच करण्यात आले. रस्त्यातच मधोमध १०० मीटर लांब गटाराचे बांधकाम अर्धवट आहे. त्यामुळे सायकलस्वार, दुचाकीचालक अनेकदा या खड्ड्यात पडून जखमी झाले आहेत. स्थानिक नगरसेवकाकडे पाठपुरावा करूनही लक्ष न दिल्याने सत्ताधारी व प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर प्रतीकात्मक श्राद्ध आंदोलन छेडावे लागले, असे मोंडकर यांनी सांगितले.
..अन्यथा ‘भीक मांगो’
- शहरातील या खड्डेमय रस्त्याबाबत पालिका प्रशासन व सत्ताधारी यांचे लक्ष वेधण्यासाठी रस्त्याचे स्थानिक नागरिकांनी श्राद्ध घातले. अनोख्या पद्धतीने करण्यात आलेले हे श्राद्ध आंदोलन रस्त्याबाबत लक्ष वेधण्यासाठी होते.
- स्थानिक नगरसेवकांनी दुर्लक्ष केल्यामुळेच हा रस्ता रखडल्याचा आरोप करण्यात आला. येत्या १५ दिवसांत रस्त्याची डागडुजी न झाल्यास पालिकेच्या कार्यालयासमोर रस्ता कामासाठी ‘भीक मांगो’ आंदोलन छेडणार असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले.
 

Web Title: Shraddha Prohibition of the paved road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.