रामेश्वराकडून शिवाजी महाराजांना मानाचा जिरेटोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 07:20 PM2020-02-15T19:20:05+5:302020-02-15T19:21:22+5:30
कांदळगावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व आदीमाया भवानी माता यांचा ऐतिहासिक त्रैवार्षिक भेट सोहळा शुक्रवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. भेट सोहळ्यात किल्ले सिंधुदुर्गवर श्री रामेश्वराकडून छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा जिरेटोप घालण्यात आला. या ऐतिहासिक सोहळ्यामुळे कांदळगाव, कोळंबसह शहर परिसर भक्तिमय बनला होता.
मालवण : कांदळगावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व आदीमाया भवानी माता यांचा ऐतिहासिक त्रैवार्षिक भेट सोहळा शुक्रवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. भेट सोहळ्यात किल्ले सिंधुदुर्गवर श्री रामेश्वराकडून छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा जिरेटोप घालण्यात आला. या ऐतिहासिक सोहळ्यामुळे कांदळगाव, कोळंबसह शहर परिसर भक्तिमय बनला होता.
श्री देव रामेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, भवानी मातेच्या त्रैवार्षिक भेट सोहळ्याची सुरुवात शुक्रवारी सकाळी कांदळगाव येथील श्री देव रामेश्वर मंदिर येथून झाली. श्री देव रामेश्वर वारेसूत्र, तरंग व रयतेसह कांदळगाव येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटीसाठी ढोल-ताशांच्या गजरात रवाना झाला. या सोहळ्यात देवस्थानचे अध्यक्ष शिवराम परब, सचिव उदय राणे यांच्यासह अन्य पदाधिकारी, देवस्थानचे सर्व मानकरी, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
सुरुवातीस कोळंब खडवण येथे राजू जाधव मित्रमंडळाच्यावतीने श्री देव रामेश्वरासह अन्य देवतांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. त्यानंतर नेरकर कुटुंबीयांच्यावतीने कोळंब येथे देवतांचे स्वागत झाले. भेट सोहळ्याच्या निमित्ताने रस्त्याच्या दुतर्फा आकर्षक रांगोळ्या, गुढ्या उभारण्यात आल्या होत्या. कोळंब येथे देवतांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. कोळंब ग्रामपंचायत तसेच स्थानिक ग्रामस्थांच्यावतीने कोळंब हद्दीत देवतांचे स्वागत झाले. त्यानंतर धुरीवाडा येथील वेशीवर रामेश्वर मांड, जोशी मांड यांच्यावतीने स्वागत करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, भाजप शहराध्यक्ष दीपक पाटकर, उमेश नेरूरकर, नाना पारकर यांच्यासह शहरातील व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ऐतिहासिक भेट सोहळ्यात हजारो भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या सोहळ्यानिमित्त शहरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. देवतांच्या दर्शनासाठी भाविकांची झुंबड उडाल्याचे दिसून येत होते.
धुरीवाडा येथे देवतांचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले. भेट सोहळ्यात सहभागी झालेल्या भाविकांसाठी कोळंब येथे कोळंबकर कुटुंबीय, फोवकांडा पिंपळ रिक्षा चालक-मालक संघटनेच्यावतीने मोफत शीतपेय उपलब्ध करून देण्यात आले होते. फोवकांडा पिंपळ येथून या सर्व देवता जोशी मांड येथे रवाना झाल्या.
दुपारी महाप्रसाद झाल्यानंतर श्री देव रामेश्वरसह अन्य देवता होडीतून किल्ले सिंधुदुर्ग येथे दाखल झाल्या. किल्ले प्रवासी होडी वाहतूक संघटना, शिवशक्ती जलपर्यटन संस्था, रामचंद्र आचरेकर यांच्यावतीने भाविकांसाठी मोफत होड्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
किल्ले सिंधुदुर्गवर श्री देव रामेश्वराचे किल्ला रहिवाशांच्यावतीने जल्लोषी स्वागत करण्यात आले. सर्व धार्मिक विधी पार पडल्यावर श्री देव रामेश्वर-छत्रपती शिवाजी महाराज यांचा ऐतिहासिक भेट सोहळा दिमाखात पार पडला. यावेळी श्री देव रामेश्वराच्यावतीने छत्रपतींना मानाचा जिरेटोप घालण्यात आला. यानंतर श्री देव रामेश्वर व आदीमाया भवानी माता यांचीही भेट झाली.
श्री देव रामेश्वर किल्ले सिंधुदुर्गवर दांडी येथे सायंकाळी दांडेश्वराच्या दर्शनासाठी रवाना झाला. यानंतर सायंकाळी उशिरा या सर्व देवता मेढ्यातील मौनीनाथ महाराज मंदिर येथे दाखल झाल्या. शनिवारी सकाळी कुशेवाडा येथील भेटीनंतर बाजारपेठेतील रामेश्वर मांड येथे श्री देव रामेश्वर थांबणार आहे. महाप्रसादाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर सायंकाळी श्री देव रामेश्वर अन्य देवता, तरंग, वारेसूत्र व रयतेसह पुन्हा माघारी कांदळगाव येथे परतणार आहे.