श्रुती बुजरबरूवा यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 05:51 PM2019-08-29T17:51:52+5:302019-08-29T17:52:23+5:30
कणकवली येथील गंधर्व फाउंडेशनच्यावतीने ३२वी गंधर्व संगीत सभा आशिये येथील श्री दत्त क्षेत्र येथे आयोजित करण्यात आली होती. या संगीत सभेत पं. विजय कोपरकर यांच्या शिष्या व आसामच्या गायिका श्रुती बुजरबरूवा यांनी गायन सादर केले. त्यांच्या सुमधूर गाण्याने कणकवलीकर रसिक मंत्रमुग्ध झाले . यानिमित्ताने त्यांना एक सुखद अनुभव घेता आला.
सुधीर राणे
कणकवली : येथील गंधर्व फाउंडेशनच्यावतीने ३२वी गंधर्व संगीत सभा आशिये येथील श्री दत्त क्षेत्र येथे आयोजित करण्यात आली होती. या संगीत सभेत पं. विजय कोपरकर यांच्या शिष्या व आसामच्या गायिका श्रुती बुजरबरूवा यांनी गायन सादर केले. त्यांच्या सुमधूर गाण्याने कणकवलीकर रसिक मंत्रमुग्ध झाले . यानिमित्ताने त्यांना एक सुखद अनुभव घेता आला.
ही गंधर्व संगीत सभा भालचंद्र खानोलकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दामोदर खानोलकर यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती. गंधर्व फाऊंडेशन ही शास्त्रीय संगीताचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी दर महिन्याला मैफिलींचे आयोजन करणारी जिल्ह्यातील एक संस्था आहे. अनेक देश विदेशातील कलाकार या संगीत सभेत गाण्यास उत्सुक असतात. कणकवलीकर रसिकांची उपस्थिती व मिळणारी दाद ही या मैफिलीला अजून उंचीवर नेते. या महिन्यातील संगीत सभा आसामच्या गायिका श्रुती बुजरबरूवा यांच्या सुश्राव्य गायनाने पार पडली. त्यांना संवादीनी साथ वरद सोहोनी व तबला साथ हेरंब जोगळेकर यांनी केली.
श्रुती यांनी प्रथम राग पुरिया कल्याण मधील 'आज सो बन ' ही विलंबीत एकताल व ' मन हरवा आयो रे ' ही द्रूत तीनतालातील रचना सादर केली. त्यानंतर हमीर रागामध्ये सुंदर बदन श्याम (मध्यलय झपताल), तेंदेरे कारन (दृत एकताल) व चंचल चपल ( अती दृत एकताल) या बंदिशी गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध केलं.
उपस्थित कलाकारांचे स्वागत दामोदर खानोलकर यांनी केले. मध्यांतरामधे प्रसाद घाणेकर यांनी श्रुती यांची मुलाखत घेतली. आसाम ते पुणे या संगीताच्या प्रवासाबद्दल श्रुती यांनी सांगितले. बिहू हा आसामी गानप्रकार त्यांनी सादर केला. मूळच्या आसामच्या असूनही श्रुती यांनी अतिशय सुंदर मराठी भाषेत मुलाखत दिली. एस. एन. डी. टी. पुणे येथे एम.ए. पर्यंतचा प्रवास कसा झाला हे त्यांनी या संवादात सांगितले.
मैफिलीच्या उत्तरार्धात पद्मविभूषण गिरिजादेवी यांचा एक दादरा श्रुती यांनी सादर केला. 'आज राधा ब्रीज को चली ' ही भैरवी गाऊन त्यानी या मैफिलीची सांगता केली. सिटी एन.सी.पी.ए. शिष्यवृती, श्रीमती विजया घाटे पुरस्कार २०१९ अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित या गायिकेने सर्व रसिकांना मंत्रमुग्ध केले.
ही संगीत सभा यशस्वीतेसाठी अभय खडपकर, सागर महाडिक, किशोर सोगम, संतोष सुतार, श्याम सावंत, दामोदर खानोलकर, मयूर कुलकर्णी, विलास खानोलकर, ध्वनिव्यवस्थापक राजेश गुरव, विजय घाटे, मनोज मेस्त्री यांनी मेहनत घेतली.
३३ वी संगीत सभा २२ सप्टेंबर रोजी!
गन्धर्व फाऊंडेशनच्यावतीने ३३ व्या गंधर्व संगीत सभेचे आयोजन २२ सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे. पं. अरविंद मुळगांवकर व पं. शुभांकर बॅनर्जी यांचे शिष्य तरूण लाला (मुंबई) हे एकल तबला वादन प्रस्तुत करणार आहेत. यावेळी रसिकांनी उपस्थीत राहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.