दिव्यांग विद्यार्थिनी श्रुती पाटील हिच्या लढ्याला अखेर यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 03:06 PM2020-03-06T15:06:10+5:302020-03-06T15:08:08+5:30
इयत्ता दहावीमध्ये असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षण मंडळाने मोठ्या अक्षरांची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्याने त्यांना परीक्षा देणे सोईचे बनले आहे. न्यायालयाच्या या आदेशामुळे श्रुती पाटील या दिव्यांग विद्यार्थिनीच्या लढ्याला अखेर यश आले आहे.
वेंगुर्ला : इयत्ता दहावीमध्ये असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षण मंडळाने मोठ्या अक्षरांची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्याने त्यांना परीक्षा देणे सोईचे बनले आहे. न्यायालयाच्या या आदेशामुळे श्रुती पाटील या दिव्यांग विद्यार्थिनीच्या लढ्याला अखेर यश आले आहे.
वेंगुर्ला हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीत शिकत असलेली श्रुती दीपक पाटील ही अंशत: अंध आणि सेरेब्रल पाल्सी या त्रासाने ग्रासली आहे. आपल्यासारख्या अनेक दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये मोठ्या अक्षरांची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून द्यावी, अशी श्रुती पाटील हिने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे सरकारच्या अध्यादेशानुसार देण्याची विनंती केली होती. मात्र, ही विनंती शिक्षण मंडळाने फेटाळून लावली होती.
दरम्यान, त्याविरोधात श्रुतीच्यावतीने अॅड. प्रोस्पर डिसोझा यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. दिव्यांग विद्यार्थ्यांची ही समस्या न्यायालयाने लक्षात घेऊन शिक्षण मंडळाने मोठ्या अक्षरांची प्रश्नपत्रिका देण्याचे आदेश दिले. त्यानुसार शिक्षण मंडळाने केवळ विशेष बाब म्हणून दिव्यांग विद्यार्थ्यांना मोठ्या अक्षरांची प्रश्नपत्रिका देण्याची तयारी दर्शविली होती.
मंगळवार ३ मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू झाली असून न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षण मंडळाने दिव्यांग विद्यार्थ्यांना मोठ्या अक्षरांची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिली आहे. शिक्षण मंडळाने केलेल्या या सहकार्याबद्दल दिव्यांग विद्यार्थ्यांना दहावीची परीक्षा देणे सोईचे बनले आहे. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांमध्येही समाधानाचे वातावरण होते.