कणकवलीत सर्व्हिस रोड लगतचा साईड प्लेटचा पत्रा कोसळला कारवर ; पोलीस ठाण्यात तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 04:32 PM2020-08-04T16:32:36+5:302020-08-04T16:44:23+5:30
मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण काम करणाऱ्या ठेकेदार कंपनी दिलीप बिल्डकॉन ्चा हलगर्जीपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे,
कणकवली : मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण काम करणाऱ्या ठेकेदार कंपनी दिलीप बिल्डकॉंनचा हलगर्जीपणा पुन्हा एखदा उघड झाला आहे.
कणकवलीतील उबाळे मेडिकल समोर चालत्या कारवर साईड प्लेटचा पत्रा कोसळला. मात्र, चालकाच्या प्रसंगावधानाने सुदैवाने दुर्घटना टळली आहे.
मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावरील कणकवलीतील उबाळे मेडिकलसमोर
दिगंबर शांताराम भोसले हे आपल्या ताब्यातील स्विफ्ट डिझायर ( क्रमांक एम. एच-४३-ए.एफ.२१३७) ही कार घेऊन आले. ते कलमठच्या दिशेने जात होते.
भोसले आपल्या ताब्यातील कार चालवत असताना अचानक दिलीप बिल्डकॉनने सर्व्हिस रोड लगत उभा केलेला साईड प्लेटचा पत्रा कोसळला.
उड्डाणपुलाच्या बॉर्डर स्लॅबसाठी ठेकेदार दिलीप बिल्डकॉनने लोखंडी सांगाडा उभारला आहे. त्यालगत असलेला सर्व्हिस रोडवरील पत्रा कारवर अचानक कोसळला.
हा कोसळणारा पत्रा पाहून भोसले यांनी प्रसंगावधान राखून चपळाईने कार पुढे नेली. त्यामुळे तो पत्रा कारच्या मागील भागावर कोसळून कारचे नुकसान झाले.
मात्र, मोठी दुर्घटना टळली.
या घटनेमुळे ठेकेदाराच्या कामातील बेजबरदारपणाचा प्रत्यय पुन्हा कणकवली शहरवासियांना आला आहे.
दिगंबर भोसले यांनी ऍड. स्वप्नील सावंत यांच्यासह कणकवली पोलीस स्टेशन गाठत या घटनेची तक्रार दिली.
ठेकदाराने प्रवासी, वाहनचालक यांच्या सुरक्षितेकडे दुर्लक्ष करत काम सूरु ठेवल्याबाबत तक्रार दाखल करून घेण्याचा भोसले यांनी पोलिसांना आग्रह केला.
मात्र, पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
त्यामुळे कणकवली पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता १८६० चे कलम ४२७ नुसार दिलीप बिल्डकॉन विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
कणकवली शहरात बॉक्सेलचा कोसळलेला भाग, स्लॅबचे काँक्रीट ओतणे सुरू असतानाच जमीनदोस्त झालेला उड्डाणपुलाचा बॉर्डर स्लॅब आणि आता चालत्या गाडीवर कोसळलेला वजनदार पत्रा असा हलगर्जीपणा घडूनही ठेकेदारावर अजूनपर्यंत दखलपात्र गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे शहरवासीयांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
तसेच महामार्ग कामामुळे मोठी दुर्घटना घडावी याची प्रतीक्षा प्रशासन करीत आहे का? असा प्रश्नही यानिमित्ताने विचारला जात आहे,