कुडाळातील आंबेडकरनगरला पुराचा वेढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 11:53 PM2017-07-19T23:53:30+5:302017-07-19T23:53:30+5:30
कुडाळातील आंबेडकरनगरला पुराचा वेढा
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम राहिल्याने बहुतांशी भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. मंगळवारी रात्री भंगसाळ नदीला आलेल्या पुरामुळे रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास कुडाळ शहरातील डॉ. आंबेडकर नगरातील सात ते आठ घरांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने येथील नागरिकांना रातोरात सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागले. बुधवारी सायंकाळपर्यंत पूरस्थिती ‘जैसे थे’ होती.
मालवण तालुक्यातील मसुरे खोतजुवा येथे कालावल नदीपात्रात सानिया साईप्रसाद खोत (वय ३५),
नीलिमा नीलेश खोत (३५) आणि दीप्ती खोत (३६) या तीन महिला, दशरथ खोत (४५), नंदादीपक खोत (४0) हे दोन पुरुष व आर्यन खोत (९) हा मुलगा असे सहाजण खोतजुवा येथून मसुरे येथे नेहमीप्रमाणे शेतीच्या कामासाठी जात असताना पुरामुळे नदीपात्रात गेले. यावेळी किनारपट्टीवरील ग्रामस्थांनी अन्य होडींचा आधार घेत सर्वांना वाचविले. ही घटना बुधवारी दुपारी तीन वाजता घडली.
नदीनाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने पुराचे पाणी शेतात, बाजारपेठेत शिरले होते. पुराचे पाणी पुलांवरून वाहू लागल्याने तेथील वाहतूक विस्कळीत झाली होती. जिल्ह्यात काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या असून, लाखभर रुपयांचे नुकसान झाले आहे. मंगळवारपासून सुरू झालेला मुसळधार पाऊस काही केल्या थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. बुधवारीसुद्धा दिवसभर आपली संततधार त्याने कायम ठेवली होती. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.
दोडामार्ग तालुक्यातील कुडासे गावचे पूल पाण्याखाली गेले होते. केर, घोटगेवाडी, परमे यांना जोडणाऱ्या पुलावर अर्ध्या फुटापेक्षा कमी पाणी असूनही पुलाला रेलिंग नसल्याने व पाण्याचा वेग जास्त असल्याने येथील वाहतूक बंद होती.