दूरसंचारच्या जिल्हा प्रबंधकांना घेराव, साटेली-भेडशी ग्रामस्थ आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 04:16 PM2020-02-14T16:16:12+5:302020-02-14T16:17:42+5:30
दोडामार्ग तालुक्यात दूरसंचारची सुविधा काही महिने ठप्प असल्याने ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्राहकांनी गुरुवारी साटेली-भेडशी येथील ग्राहक सेवा केंद्रात भारत संचार निगमचे जिल्हा प्रबंधक सुधाकर भिसे यांना घेराव घालून दूरसंचारच्या भोंगळ कारभाराबाबत जाब विचारला.
दोडामार्ग : तालुक्यात दूरसंचारची सुविधा काही महिने ठप्प असल्याने ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्राहकांनी गुरुवारी साटेली-भेडशी येथील ग्राहक सेवा केंद्रात भारत संचार निगमचे जिल्हा प्रबंधक सुधाकर भिसे यांना घेराव घालून दूरसंचारच्या भोंगळ कारभाराबाबत जाब विचारला.
विविध समस्यांबाबत वेळोवेळी कल्पना देऊनही याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. अखेर १५ दिवसांत सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन भिसे यांनी दिल्यानंतर तब्बल साडेतीन तासानंतर घेराव मागे घेण्यात आला.
साटेली-भेडशी येथील ग्राहक सेवा केंद्र्रात दूरसंचार विभागाचे जिल्हा प्रबंधक भिसे यांची गुरुवारी नियोजित भेट होती. गेल्या काही महिन्यांपासून दूरसंचारची सेवा सुरळीत मिळत नसल्याने ग्राहक त्रस्त आहेत. त्यामुळे गुरुवारी सकाळपासूनच ग्राहकांनी साटेली-भेडशी सेवा केंद्रात ठाण मांडले. मात्र, दुपारपर्यंत भिसे उपस्थित राहिले नसल्याने ग्राहक अधिकच संतप्त झाले.
दुपारच्या दरम्यान भिसे केंद्रात आल्यानंतर ग्राहकांनी त्यांना घेराव घालत प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. यावेळी कावरेबाबरे झालेल्या भिसे यांनी आपण १० दिवसांपूर्वी येथील कार्यभार स्वीकारला आहे. मला या ठिकाणच्या समस्यांचा अभ्यास करू द्या, असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस निरीक्षक सुनील थोपटे यांनीही ग्राहकांशी संवाद साधला.
मात्र, नागरिकांनी आक्रमक होत प्रत्येकवेळी नवीन अधिकारी हजेरी लावतो आणि वेळ मागतो. पण आमच्या समस्यांचे निराकरण कधीच होत नाही. गेल्या दहा दिवसांत दोन वेळा मनोरा बंद करण्यात आला होता. वीज वितरणचे बिल थकीत आहे. या परिसरात हजारो ग्राहक सेवा घेत आहेत. तरीदेखील कंपनीला बिल भरणे शक्य होत नाही हे दुर्दैव आहे, असे मत नागरिकांनी मांडल्यावर जिल्हा प्रबंधकही निरुत्तर झाले.
समस्यांचे समाधान झाल्याशिवाय येथून हलणार नाही, असा पवित्रा नागरिकांनी घेतला. अखेर १५ दिवसांत दूरसंचारच्या सेवेबाबत असलेल्या सर्व समस्या सोडविल्या जातील, असे आश्वासन भिसे यांनी दिल्यानंतर घेराव मागे घेण्यात आला.
यावेळी साटेली-भेडशी सरपंच लखू खरवत, सदस्य डांगी, कलय्या हिरेमठ, अल्ताफ शेख, संदेश वरक, प्रकाश पवार, सामाजिक कार्यकर्ते मायकल लोबो, गोपाळ गवस, सूर्यकांत धर्णे, प्रकाश मोर्ये, वायंंगणतड उपसरपंच प्रथमेश
सावंत, गोविंद शिरसाट, भैय्या पांगम आदी ग्रामस्थ उपस्थित होते.