काँग्रेस पुन्हा भक्कम होण्याची लक्षणे
By admin | Published: November 25, 2015 12:14 AM2015-11-25T00:14:27+5:302015-11-25T00:31:32+5:30
सतीश सावंत : नगराध्यक्ष निवडणुकीनंतर वैभववाडीत पायी मिरवणूक
वैभववाडी : शिवसेना आणि भाजपच्या भांडणात विकास होणार नाही हे लक्षात आल्याने त्यांच्यातील काही सुज्ञ लोकांनी वैभववाडी आणि दोडामार्गची सत्ता काँग्रेसच्या हातात दिली आहे. त्याबद्दल त्यांना आम्ही धन्यवाद देतो. काँग्रेस जिल्ह्यात पुन्हा भक्कम होण्याची ही लक्षणे आहेत. त्यामुळे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेच्या अपेक्षेप्रमाणे दोन्ही शहरे आदर्शवत बनविली जातील, असे मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. तसेच वैभववाडी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर काँग्रेसने संपूर्ण बाजारपेठत फटाक्यांची आतषबाजी करुन पायी विजयी मिरवणूक काढली.
नगराध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमिवर सावंत वैभववाडीत आले होते. नगराध्यक्षपदी रवींद्र रावराणे यांची निवड जाहीर होताच सावंत यांनी पुष्पहार घालून रावराणेंचे अभिनंदन केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. वैभववाडी आणि दोडामार्गात काँग्रेसचे नगराध्यक्ष विराजमान झाले आहेत. त्यामुळे कार्यकर्ते आनंदात आहेत. वैभववाडीतील ग्रामविकास आघाडीत फूट पडली. अन्यथा आघाडीचे चौघेही आज एकत्र दिसले असते. भाजप आणि शिवसेना राज्यात सत्तेत एकत्र असूनही त्यांच्यातील भांडणे विकोपाला गेली आहेत. त्यामुळे त्यांच्या भांडणात विकासावर परिणाम होत आहे. युतीतील भांडणाचा दोन्ही शहरांच्या विकासावर परिणाम होऊ नये म्हणून वैभववाडी आणि दोडामार्गची सत्ता काँग्रेसच्या हाती यावी अशी जनतेचीच इच्छा होती. अगदी त्या प्रमाणेच घडले आहे.
सावंत पुढे म्हणाले, आमदार नीतेश राणे आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळे वैभववाडीत काँग्रेसचे रवींद्र रावराणे नगराध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. तर युतीकडे दहा नगरसेवक असूनही दोडामार्गात ते आपला नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष बसवू शकले नाहीत. ही काँग्रेस पुन्हा भक्कम होण्याची लक्षणे आहेत. त्यामुळे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी खासदार नीलेश राणे, आमदार नीतेश राणे यांच्या साथीने ही दोन्ही शहरे आदर्शवत बनविली जातील. कालावधीचा फॉर्म्युला वरीष्ठ नेतेच ठरवतील असेही सावंत यांनी स्पष्ट केले. वैभववाडीतील दोन्ही पदांच्या निवडीनंतर रावराणे व चव्हाण यांना पुष्पहार घालून तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सावंत यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी तालुकाध्यक्ष भालचंद्र साठे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप रावराणे, माजी सभापती अरविंद रावराणे, नासीर काझी, बाळा हरयाण, बंड्या मांजरेकर, अंबाजी हुंबे, शुभांगी पवार, विश्राम राणे, काँग्रेसचे सर्व नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
राणेंमुळेच मी
नगराध्यक्ष : रावराणे
वाभवे-वैभववाडी नगराच्या विकासासाठी मतदारांनी मला बिनविरोध निवडून दिले. त्याबद्दल धन्यवाद देतो. मी काँग्रेस पक्षाचाच कार्यकर्ता असून काँग्रेस नेते नारायण राणे आणि आमदार नीतेश राणे यांच्यामुळेच पहिल्या नगराध्यक्ष पदाचा मान मला मिळाला. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचा विकास करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे नगराध्यक्ष रवींद्र रावराणे यांनी स्पष्ट केले.