सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर स्त्री परिचरांचा मूक मोर्चा, लक्ष वेधले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 04:17 PM2017-12-19T16:17:17+5:302017-12-19T16:21:40+5:30
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आरोग्य विभागामध्ये काम करणाऱ्या शेकडो अंशकालीन स्त्री परिचरांनी आपल्या प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधले.
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद आरोग्य विभागामध्ये काम करणाऱ्या शेकडो अंशकालीन स्त्री परिचरांनी आपल्या प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधले.
आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी अंशकालीन स्त्री परिचर संघटना सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षा उषा नारायण लाड यांच्या नेतृत्वाखाली मूक मोर्चा काढला. या मोर्चाची सुरुवात ओरोस फाटा येथून दुपारी बारा वाजता झाली व अवघ्या काही मिनिटांत हा मोर्चा जिल्हाधिकारी भवनावर येऊन धडकला.
यावेळी संघटना सचिव अर्चना महाले, जिल्हा संघटना शितल सावंत, अनिता रावराणे, स्वप्ना राणे, अनिता साटम, सुवर्णा आंबेरकर या पदाधिकाऱ्यांसह शेकडो स्त्री परिचर उपस्थित होत्या.
मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केले. जिल्हा परिषद आरोग्य विभागामध्ये काम करणाऱ्या अंशकालीन स्त्री परिचर या प्रतिदिन अवघ्या चाळीस रुपये या तुटपुंज्या मानधनावर काम करतात.
शासनाच्या विविध आरोग्य विषयक योजना या कर्मचारी डोंगर कपारीतून शोषित पिडितांना पोहोचविण्याचे काम करत आहेत. मानधनात वाढ व्हावी यासाठी या कर्मचाऱ्यांनी विद्यमान व तत्कालीन आघाडी सरकारकडे गाºहाणे मांडले होते. परंतु, अद्यापही ही मागणी पूर्ण होऊ शकली नाही.
या आहेत मागण्या
- किमान मानधन सात हजार रुपये मिळाव
- कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व प्रकारच्या रजा लागू कराव्यात
- इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे भाऊबीज मिळावी
- गणवेशासह धुलाई भत्ता लागू करावा
- किमान कायदा लागू करावा
- पूर्वीप्रमाणेच आरोग्य खात्यांतर्गत मलेरिया, कुष्ठरोग, क्षयरोग,नारू या सर्व्हेचे काम करताना त्याचा मोबदला मिळावा