सिंधु २ नौका सागरी गस्तीसाठी पुन्हा सिंधुदुर्ग किनारपट्टीवर समुद्रात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 03:59 PM2017-12-13T15:59:06+5:302017-12-13T16:09:24+5:30
ओखी वादळामुळे समुद्राला आलेल्या उधणाचा तडाखा बसून नादुरुस्त झालेली सिंधु २ ही सागरी पोलिसांची गस्ती नौका दुरुस्तीनंतर जेसीबीच्या सहाय्याने पुन्हा समुद्रात लोटण्यात आली. त्यामुळे किनारपट्टीच्या संरक्षणासाठी सिंधु २ गस्तीनौका पुन्हा सज्ज झाली आहे.
मालवण : ओखी वादळामुळे समुद्राला आलेल्या उधणाचा तडाखा बसून नादुरुस्त झालेली सिंधु २ ही सागरी पोलिसांची गस्ती नौका दुरुस्तीनंतर जेसीबीच्या सहाय्याने पुन्हा समुद्रात लोटण्यात आली. त्यामुळे किनारपट्टीच्या संरक्षणासाठी सिंधु २ गस्तीनौका पुन्हा सज्ज झाली आहे.
सिंधुदुर्ग किनारपट्टीवर सागरी गस्तीसाठी रत्नागिरी येथील दोन ट्रॉलर्स भाडेतत्वावर घेण्यात आले असून आता या गस्तीनौकेतून सागरी गस्तीला सुरुवात करण्यात येईल, असे सागरी पोलीस उपनिरीक्षक अनिल साठे यांनी सांगितले.
ओखी चक्रीवादळामुळे समुद्राला आलेल्या उधाणाचा फटका मालवण बंदरात नांगरून ठेवलेल्या सिंधु ५ व सिंधु २ या सागरी पोलिसांच्या गस्तीनौकांना बसला होता. यामध्ये सिंधु ५ ही नौका समुद्रात बुडाली होती तर सिंधु २ या नौकेच्या इंजिनमध्ये पाणी गेल्याने ती नादुरुस्त झाली होती.
त्यामुळे या दोन्ही नौका पोलिसांनी मच्छिमार व किल्ला होडी व्यावसायिकांच्या मदतीने किनाऱ्यावर आणून ठेवल्या होत्या. त्यानंतर पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी या नादुरुस्त नौकांची पाहणी करून सिंधु २ ही नौका लवकरात लवकर दुरुस्त करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या.
गस्ती नौका दुरुस्ती केल्यानंतर सोमवारी नौका समुद्रात लोटण्याचा निर्णय घेण्यात आला. सिंधु २ ही नौका समुद्रात लोटण्यासाठी चार तासांचा अवधी लागला.
यावेळी सागरी पोलीस उपनिरीक्षक अनिल साठे, एस. पी. खांदारे, पोलीस कर्मचारी पवार, चव्हाण, टोकाळे, नौका कर्मचारी आर.पी. तारी, के. ई. कुमठेकर, एस. एस. शेलटकर, ए. जी. ढोके, एस. ए. पावसकर यांनी जेसीबीच्या सहाय्याने हि नौका समुद्रात लोटली. ही गस्तीनौका पुन्हा सागरी गस्तीसाठी सज्ज झाल्याने मच्छिमार बांधवानी समाधान व्यक्त केले आहे.