सिंधुदुर्ग : गावडेच्या घरातून २२ हजार जप्त, पैसे अन्य व्यक्तींच्या नावे ठेवल्याचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 06:19 PM2018-05-26T18:19:50+5:302018-05-26T18:19:50+5:30
नारायण राणे यांचा नातेवाईक असल्याचे सांगून युवकांना लाखो रूपयांना चुना लावणारा सुनील गावडे याच्या सावंतवाडीत भाड्याने राहत असलेल्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. यात पोलिसांना २२ हजारांची रोख रक्कम तसेच काही कागदपत्रे हाती लागली आहेत.
सावंतवाडी : नारायण राणे यांचा नातेवाईक असल्याचे सांगून युवकांना लाखो रूपयांना चुना लावणारा सुनील गावडे याच्या सावंतवाडीत भाड्याने राहत असलेल्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. यात पोलिसांना २२ हजारांची रोख रक्कम तसेच काही कागदपत्रे हाती लागली आहेत.
तर त्याच्या बँक खात्याचीही झाडाझडती घेतली, पण त्यात रक्कम नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. गावडे याने गंडा घातलेले पैसे स्वत:च्या खात्यावर न ठेवता तो अन्य कोणत्या तरी व्यक्तीच्या खात्यात ठेवत असावा, असा संशय पोलिसांना आहे. त्या दृष्टीनेही पोलीस चौकशी करीत आहेत.
नारायण राणे यांचा नातेवाईक असल्याचे भासवून अनेकांना लाखो रूपयांना गंडा घालणारा मूळ कणकवली-वागदे येथील सुनील गावडे याचे अनेक प्रताप बाहेर येऊ लागले आहेत. आतापर्यंत गावडे याच्या विरोधात पाच जणांनी तक्रारी दिल्या आहेत. या सर्वांची रक्कम २० लाखाच्या घरात आहे. पण प्रत्यक्षात गावडे याच्याजवळ झाडाझडती घेतली असता पोलिसांच्या हाती काही लागले नाही.
पोलिसांनी गावडे यांची बँक खाती असलेल्या सर्व बँकाना पत्रे दिली आहेत. तर काही बँक खात्याची चौकशी केली आहे. पण या बँक खात्यात पैसे ठेवण्यात आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. गावडे राहत असलेल्या लक्ष्मीनगर येथील भाड्याच्या घराची पोलिसांनी झडती घेतली. त्यावेळी पोलिसांना २२ हजारांची रोकड आढळून आली. तर काही कागदपत्रेही सापडली आहेत. यात अनेक युवकांकडून नोकरीच्या निमित्तानेही कागदपत्रे गावडे याने घेतली होती.
तीच कागदपत्रे असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे गंडा घालून मिळविलेले लाखो रूपये गावडे याने कुठे ठेवले याचा पोलीस शोध घेत आहेत. गावडे याच्या अंगावर लाखो रूपये किमतीचे दागिने होते. तसेच अलिशान गाड्याही होत्या. पण यातील एकही गाडी त्याच्या नावावर नव्हती, असे पोलिसांनी स्पष्ट केले. तसेच गंडा घालून मिळविलेले पैसेही गावडे याने कोणाच्या तरी नावावर ठेवले असावेत, असा संशय आहे.
तसेच तो अलिकडे नवनवीन दुचाकीही वापरत होता. या गाड्यांबाबत पोलिसांना माहिती मिळाली असून, त्याचाही पोलीस शोध घेत आहेत. गावडे हा सावंतवाडीत कसा आला, तसेच त्याने सावंतवाडीत आपले पहिले बस्तान कुठे बसवले. या सर्व खोलात पोलीस जाणार असून, पोलिसांनी ही माहिती घेतल्यास अनेक धक्कादायक प्रकार पुढे येऊ शकतात. मात्र सध्या पोलीस फसवणूक झालेल्या युवकांचे जबाब नोंदवत आहेत.
अलिशान कार अन्य व्यक्तीच्या नावावर
सुनील गावडेकडे एक अलिशान कार होती. ही कार अन्य व्यक्तीच्या नावावर होती. सध्या ती कार पोलिसांना मिळत नाही. ही कार पोलिसांनी शोधून काढल्यास अनेक धक्कादायक प्रकार बाहेर येतील. पोलिसांच्या मते ही कार ज्या व्यक्तीकडून नोकरीच्या निमित्ताने पैसे घेतले होते, त्याला नोकरी न लावल्याने कार घेऊन गेले असावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सुनील गावडे हा पूर्वी उभाबाजार येथे राहत होता. तर अलिकडेच तो लक्ष्मीनगर येथे भाड्याच्या घरात राहण्यास गेला होता. या घरांची आम्ही झाडाझडती घेतली. यात आम्हाला रोख २२ हजार रूपये व नोकरीसाठी युवकांकडून घेतलेली कागदपत्रे आढळून आली आहेत. ती आम्ही जप्त केली असून, गावडेच्या बँक खात्याचीही तपासणी सुरू असल्याचे पोलीस उपनिरीक्षक अरूण सावंत यांनी स्पष्ट केले आहे.