सिंधुदुर्ग : २४० घरांना सतर्कतेचा इशारा, मालवण तहसील कार्यालयाकडून स्थलांतराच्या नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 04:52 PM2018-06-12T16:52:35+5:302018-06-12T16:52:35+5:30
गेले तीन दिवस मालवण तालुक्याला झोडपून काढणाऱ्या पावसाने सोमवारी काहीशी उसंत घेतली. मात्र, अतिवृष्टीमुळे देवली, काळसे, माळगाव, धामापूर, देवबाग, देऊळवाडा, मर्डे, मसुरे आदी भागात धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्याने या भागातील धोका पोहोचू शकणाऱ्या एकूण २४० घरांना सतर्कतेच्या व स्थलांतराच्या नोटिसा मालवण तहसील कार्यालयाकडून बजावण्यात येणार आहेत.
सिंधुदुर्ग : गेले तीन दिवस मालवण तालुक्याला झोडपून काढणाऱ्या पावसाने सोमवारी काहीशी उसंत घेतली. मात्र, अतिवृष्टीमुळे देवली, काळसे, माळगाव, धामापूर, देवबाग, देऊळवाडा, मर्डे, मसुरे आदी भागात धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्याने या भागातील धोका पोहोचू शकणाऱ्या एकूण २४० घरांना सतर्कतेच्या व स्थलांतराच्या नोटिसा मालवण तहसील कार्यालयाकडून बजावण्यात येणार आहेत.
मालवण तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने तालुक्यात काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडून मोठे नुकसान झाले. मात्र, तीन दिवस अविरत बरसणाऱ्य पावसाने काल मध्यरात्री अधुनमधून हजेरी लावल्यानंतर सकाळपासून विश्रांती घेतली. सोमवारी अधुनमधून वीज पुरवठा खंडित होत राहिल्याने नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागला.
दिवसभर विश्रांती घेणाऱ्या पावसाने सायंकाळी मालवण तालुक्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. तर रात्री सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रॉक गार्डन परिसरातील खाद्यपदार्थांचा एक स्टॉल कोसळून स्थानिक व्यावसायिकाचे नुकसान झाले. मालवणात आतापर्यंत ७५९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
मालवणात झालेल्या अतिवृष्टीमुळे देवली व धामापूर येथे दरड कोसळून घरांना धोका निर्माण झाला होता. यामुळे तालुका प्रशासनाने तालुक्यात धोकादायक स्थिती निर्माण झालेल्या भागातील घराना स्थलांतराच्या नोटिसा बजावण्याचे काम हाती घेतले आहे.
यामध्ये देवली येथील २०, काळसे येथील १०, माळगाव येथील ७, धामापूर येथील ३, देऊळवाडा १०, मर्डे येथील १०, तसेच देवबाग येथील १८० अशा एकूण २४० घरांना सतर्कतेच्या व स्थलांतराच्या नोटिसा बजावण्यात येत आहेत.
नोटिसा बजावण्याचे काम तहसीलदारांच्या आदेशानुसार तलाठ्यांकडून सुरु आहे. तर मसुरे गावात संभावित पुरजन्य परिस्थिती निर्माण होण्याच्या शक्यतेने प्रशासनाकडून संपूर्ण मसुरे गावाला जाहीर सूचना देण्यात आली आहे.
पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीसाठी मालवण तहसील कार्यालयात आपत्ती नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आला असून हा कक्ष ३१ आॅक्टोबरपर्यंत २४ तास सुरु राहणार आहे.
या कक्षामार्फत आपत्ती निवारणासाठी तालुक्याच्या शासकीय यंत्रणेतील वर्ग ४ चे २८ कर्मचारी, वर्ग ३ चे ६५ कर्मचारी तसेच मालवण तहसील कार्यालयातील वर्ग ३ व ४ मधील कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहेत.
आपत्ती काळात माहिती व मदतीसाठी नियंत्रण कक्षाच्या दुरध्वनी क्रमांकावर तसेच जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाच्या १०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन तहसील कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.