सिंधुदुर्ग : धनगर समाजाचा मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 04:58 PM2018-10-05T16:58:28+5:302018-10-05T17:01:52+5:30
राज्य सरकारने धनगर समाजाला एसटी आरक्षणाचे दिलेले आश्वासन पूर्ण केले नसल्यामुळे धनगर समाजात संतापाची लाट उसळी घेऊ लागली आहे. त्यातूनच राज्यभर आरक्षणासाठी तीव्र आंदोलनाची पेटविली जात असून सिंधुदुर्गातील धनगर समाजातर्फे येत्या मंगळवारी(दि ९) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग : राज्य सरकारने धनगर समाजाला एसटी आरक्षणाचे दिलेले आश्वासन पूर्ण केले नसल्यामुळे धनगर समाजात संतापाची लाट उसळी घेऊ लागली आहे. त्यातूनच राज्यभर आरक्षणासाठी तीव्र आंदोलनाची पेटविली जात असून सिंधुदुर्गातील धनगर समाजातर्फे येत्या मंगळवारी(दि ९) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा धनगर समाज एसटी आरक्षण कृती समितीची सभा ओरोस येथे जिल्हा मुख्य संघटक सुरेश झोरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी किशोर वरक, नवलराज काळे, संजय शेळके, नवल गावडे, कानू शेळके, राजेश जानकर, रामचंद्र कोकरे, रितेश शेळके, रुपेश लांबर, रवि लांबर, अक्षय खरात, रामचंद्र काळे, विलास जंगले, भरत गोरे, रामचंद्र गोरे, रामचंद्र गावडे, रमेश शेळके, संजय खरात, विशाखा काळे आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करुन तातडीने एसटी आरक्षण लागू करण्याचे आश्वासन भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २0१४ च्या निवडणुकीत दिले होते. भाजप सत्तेवर आल्यापासून सरकारकडे धनगर समाजाचे राज्यस्तरीय नेतृत्व आरक्षणाचा पाठपुरावा करीत आहे.
सरकारने नेमलेल्या टीस समितीने अहवालही सरकारला सादर केला आहे. तरीही त्याविषयी राज्य सरकार धनगरांच्या आरक्षणाबाबत निर्णय घेण्यास तयार नाही. त्यामुळेच आरक्षण मागणीसाठी ९ आॅक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून तीव्र आंदोलन उभारण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला आहे.
जिल्ह्यातील सर्व धनगर समाज बांधवाच्या सहभागाने पारंपरिक गजनृत्य सादर करीत जिल्हा मुख्य संघटक, जिल्हा संघटक, तालुका संघटक यांच्या नेतृत्वाखाली ओरोस रवळनाथ मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. तरी या मोर्चात जिल्ह्यातील तमाम धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्य संघटक सुरेश झोरे यांनी केले आहे.
तालुकानिहाय संघटकांची नियुक्ती
यासभेत तालुकानिहाय एक जिल्हा संघटकाची नेमणूक करण्यात आली. त्यानुसार सूर्यकांत बोडके (वैभववाडी), कानू शेळके(कुडाळ), संतोष पटकारे(दोडामार्ग), विलास जंगले (सावंतवाडी), संतोष साळसकर(देवगड), सुनिल वरक (मालवण), बाबू हुंबे (कणकवली) व रामा लांबर (वेंगुर्ले) आदींची जिल्हा संघटक निवड करण्यात आली आहे. तर तालुका संघटक म्हणून प्रत्येक तालुक्यासाठी दोन संघटक निवडण्यात आले आहेत.