सिंधुदुर्ग: आंबोली घाटातील संरक्षक कठडे दयनीय, सावंतवाडी पंचायत समितीत सदस्य आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 12:14 PM2018-08-13T12:14:01+5:302018-08-13T12:19:59+5:30

आंबोलीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करा. आंबोली घाटातील संरक्षक कठडे आणि साईडपट्टीची अवस्था दयनीय असून, पोलादपूरसारखा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल सावंतवाडी पंचायत समितीच्या मासिक बैठकीत सदस्यांकडून करण्यात आला. अधिकारीच ठेकेदार बनल्याने आंबोलीची दुरवस्था झाल्याचा आरोपही करण्यात आला.

Sindhudurg: Aamdhali ghats patron patrons, Sawantwadi panchayat committee members aggressive | सिंधुदुर्ग: आंबोली घाटातील संरक्षक कठडे दयनीय, सावंतवाडी पंचायत समितीत सदस्य आक्रमक

पंचायत समितीच्या बैठकीत सदस्यांनी बांधकाम अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

Next
ठळक मुद्देआंबोली घाटातील संरक्षक कठडे दयनीयपोलादपूरप्रमाणे अपघात झाल्यास जबाबदार कोण ? सावंतवाडी पंचायत समितीत सदस्य आक्रमक

आंबोली : आंबोलीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करा. आंबोली घाटातील संरक्षक कठडे आणि साईडपट्टीची अवस्था दयनीय असून, पोलादपूरसारखा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल सावंतवाडी पंचायत समितीच्या मासिक बैठकीत सदस्यांकडून करण्यात आला. अधिकारीच ठेकेदार बनल्याने आंबोलीची दुरवस्था झाल्याचा आरोपही करण्यात आला.

सावंतवाडी पंचायत समितीची मासिक बैठक सभापती रवींद्र्र मडगावकर यांच्या अध्यक्षतेखाली गेळे येथील ग्रामपंचायत कक्षात पार पडली. यावेळी गटविकास अधिकारी गजानन भोसले, व्ही. एन. नाईक, जिल्हा परिषद सदस्या रोहिणी गावडे, एस. एस. अदाण्णवर, संदेश राणे, पंचायत समिती सदस्य संदीप तळवणेकर, मोहन चव्हाण, रुपेश राऊळ, पंकज पेडणेकर, श्रीकृष्ण सावंत, शीतल राऊळ, मेघ:श्याम काजरेकर, प्राजक्ता केळुसकर, मानसी धुरी, अक्षया खडपे, मनीषा गोवेकर, गौरी पावसकर, रेश्मा नाईक, श्रुतिका बागकर, सुनंदा राऊळ, कक्ष अधीक्षक मृणाल कार्लेकर, कक्ष अधिकारी दत्तात्रय गायकवाड आदी उपस्थित होते.

यावेळी सदस्य मोहन चव्हाण यांनी आंबोली-कुंभवडे रस्त्यावर विद्युतवाहिन्या खाली आल्याने एसटी बस अडकून पडल्या, याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला. तसेच आंबोलीसाठी वायरमनची संख्या वाढवा. सध्या एका वायरमनवर काम सुरू आहे. वाढीव वीज बिले कमी करण्याबाबत वीज वितरण विभागाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी केली. तसा ठरावही घेण्यात आला.

आरोग्य विभागाबाबत बोलताना काही वैद्यकीय अधिकारी रुग्णालयातच खासगी सेवा देतात आणि त्या बदल्यात पैसे घेतात. अशांवर कारवाई करावी, अशी मागणी रुपेश राऊळ यांनी केली. तर गोवेकर यांनी वैद्यकीय अधिकारी एकाच मेडिकलमधून औषधे घेण्यास कसे सांगतात, त्यांना काय अधिकार, याचीही चौकशी करा, अशी मागणी केली. यावर तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपण याबाबत चौकशी करून पुढील बैठकीत अहवाल सादर करू, असे सांगितले.

या बैठकीत आंबोलीतील रस्ते तसेच घाटातील संरक्षक कठड्यांवरून चांगलाच वादंग झाला. बांधकामचे शाखा अभियंता इफ्तेकर मुल्ला यांना सर्वच सदस्यांनी धारेवर धरले. आंबोलीत एकही रस्ता चांगला नाही, रस्त्यावर डांबर नाही, घाटात संरक्षक कठडा नाही, साईडपट्ट्या नाहीत. त्यामुळे एखादी पोलादपूरसारखी घटना घडली तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल करण्यात आला.

आंबोलीत यावर्षी केलेले काम पुढच्या वर्षी नसते. अधिकारीच ठेकेदार झाले आहेत. रात्रीच्या वेळी वाहने घाटातून कशी चालवायची? गेळे, कावळेसाद येथे जाणाऱ्या कुठल्याही रस्त्यांना साईडपट्ट्या नाहीत. मग पैसा कुठे खर्च केला जातो? कोणाच्या घशात जातो? असा सवाल सर्वच सदस्यांनी केला.

बांधकामच्या कार्यपध्दतीवर सदस्यांनी चांगलेच तोंडसुख घेतले. सभापती मडगावकर यांनी त्यात मध्यस्थी केल्यानंतर आंबोलीतील कामाच्या चौकशीचा ठराव घेण्याचे ठरविण्यात आले. या बैठकीत जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे प्रभारी उपविभागीय अभियंता विनायक चव्हाण यांना रुपेश राऊळ यांनी धारेवर धरले.

या बैठकीत इतर विविध विषयांवरही चर्चा झाली. बैठकीच्या सुरुवातीला राजमाता सत्वशिलादेवी भोसले, मेजर कौस्तुभ राणे आदींना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. तर मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून खासदार विनायक राऊत यांनी संसदेत मराठीतून भाषण केल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. बैठकीचे नियोजन गेळे सरपंच अर्जुन कदम यांच्यासह सदस्य आणि ग्रामसेवक यांनी केले. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

ग्रामपंचायतीकडे नोंदीचे निर्बंध लादावेत

तालुक्यातील गावात कोणतेही अनधिकृतपणे कॅम्प घेतले जातात. त्याची सर्व माहिती ग्रामपंचायतीकडे असावी. अन्यथा कोणीही गावात येऊन काही करू शकतात.अशी अनोळखी व्यक्ती एखाद्याच्या घरात घुसल्यास जबाबदार कोण? असा सवाल पंचायत समिती सदस्या मनीषा गोवेकर यांनी केला. त्यावर सभापती मडगावकर यांनी गटविकास अधिकाऱ्यांनी सरपंचांच्या बैठकीत याबाबत ग्रामसेवक व सरपंचांना माहिती द्यावी व गावात एखादा कॅम्प किंवा शिबिर झाल्यास त्याची नोंद ग्रामपंचायतीकडे करण्याबाबत निर्बंध लादावेत, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.

 

Web Title: Sindhudurg: Aamdhali ghats patron patrons, Sawantwadi panchayat committee members aggressive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.