सिंधुदुर्ग : आंबोलीत अपघात; बेळगावचा तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 05:03 PM2018-07-23T17:03:07+5:302018-07-23T17:07:24+5:30
आंबोली-गेळे फाट्याजवळ कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघे जखमी झाले. यातील भरत पद्मनेश हांजे (२६, रा. अनघोळ-बेळगाव) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सिंधुदुर्ग : आंबोली-गेळे फाट्याजवळ कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघे जखमी झाले. यातील भरत पद्मनेश हांजे (२६, रा. अनघोळ-बेळगाव) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
हा अपघात रविवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडला. आंबोली पोलीस दूरक्षेत्रात कारचालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
रविवारची सुटी असल्याने आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी भरत आणि बसलिंग धनाचार्य हे दोघे दुचाकीने आंबोलीच्या दिशेने येत होते. तर कारचालक दत्तात्रेय सुभाष जांभदाळे (रा. लातूर) आंबोलीहून कोल्हापूरकडे जात होते.
आंबोली-गेळे फाट्याजवळ जांभदाळे यांच्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघेही जखमी झाले. आंबोली पोलिसांना घटनेची माहिती मिळताच हवालदार राजेश गवस यांनी घटनास्थळी धाव घेतली.
त्यानंतर जखमींना १०८ रुग्णवाहिकेने आजरा येथे हलविण्यात आले. मात्र गंभीर जखमी असलेल्या भरत हांजे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आंबोली पोलिसात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.