सिंधुदुर्ग : आचरा, मसुरे, पेंडूर ही व्यापाराची मोठी ठाणी : विनायक परब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 05:31 PM2018-10-12T17:31:27+5:302018-10-12T17:37:49+5:30
आचरा, पेंडूर, मसुरे ही व्यापाराची मोठी ठाणी होती. मध्ययुगात म्हणजे दहाव्या, बाराव्या शतकात ही व्यापार व्यवसायाची केंद्रे होती.
सिंधुदुर्ग : आचरा, पेंडूर, मसुरे ही व्यापाराची मोठी ठाणी होती. मध्ययुगात म्हणजे दहाव्या, बाराव्या शतकात ही व्यापार व्यवसायाची केंद्रे होती. या भागात राजा राज्य करीत होता. आचऱ्याचे नागरिक व्यापारी होते. त्यांच्याकडे राजाला कर देण्याएवढा पैसा उपलब्ध होता. आचरा बंदरातून विदेशात व्यापार चालत असे. याचे काही पुरावेही हाती लागले आहेत, असे विनायक परब यांनी सांगितले.
आचरे गावात तयार होणाऱ्या रानगव्यांच्या शिंगावरील नक्षीकामाच्या कलाकृतीचा वापर विदेशात होत आहे. या नक्षीकामाला जगभरात मागणी आहे, अशी माहितीही परब यांनी दिली. आचरा येथे ह्यसमजून घेऊया आचरे गावचा इतिहासह्ण या कार्यक्रमात ते बोलत होते. हा कार्यक्रम श्री देव रामेश्वर वाचन मंदिर व धी आचरा पीपल्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास डेक्कन महाविद्यालय पुणेचे पुरातत्त्व विभागाचे प्राध्यापक डॉ. अभिजीत दांडेकर, अशोक पाडावे, स्कूल कमिटीचे चेअरमन विजय गोखले, आचरा वाचन मंदिरचे श्रीकांत सांबारी, निलिमा सावंत, बाबाजी भिसळे, कपिल गुरव, अरुण पारकर, आचरा हायस्कूलचे मुख्याध्यापक महादेव हाके, सुरेश ठाकूर, सुरेश गावकर, निलेश सरजोशी, विद्यानंद परब आदी उपस्थित होते.
आचरा येथील रामेश्वर मंदिर व गाव किती प्राचीन आहे याचे पुरावे मंदिरातच उपलब्ध असल्याची माहिती अभ्यासक विनायक परब यांनी दिली. आचरा येथील रामेश्वर मंदिरात असणारा शिलालेख हा आचरा गावच्या इतिहासाचा उलगडा करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
म्युझियम होण्याची गरज : परब
आचरे गावच्या इतिहासाची माहिती देताना विनायक परब म्हणाले, आचरा रामेश्वर मंदिराच्या मागे हजार ते बाराशे वर्षांपूर्वीचे विरगळ २००९ सालापर्यंत अस्तित्वात होते. आता मात्र फक्त तीन विरगळ शिल्लक आहेत. २२ विरगळ आता गायब आहेत. त्यात आचरा गावच्या राजाचाही विरगळ असल्याची माहिती त्यांनी दिली.
२००९ साली आचऱ्याच्या राजाच्या विरगळाचा आपण फोटो काढला होता. त्याची माहिती घेऊन त्यावर शोधनिबंधही लिहिला होता. मात्र तो तेथून गायब करण्यात आला आहे. या विरगळाची जपणूक होऊन म्युझियम होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.