सिंधुदुर्ग : घेराओनंतर सावंतवाडी पालिकेला अखेर वीज कर्मचारी मिळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 03:09 PM2018-03-24T15:09:20+5:302018-03-24T15:09:20+5:30
विद्युत विभागाने जुने नियम दाखवून नगरपालिकेचे विद्युत कर्मचारी काढून घेतले होते. मात्र, या विरोधात नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासह नगरसेवक व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी विद्युत विभागाचे उपविभागीय अभियंता अमोल राजे यांना शुक्रवारी घेराओ घालत जाब विचारताच पुन्हा वीज कर्मचारी पूर्ववत देण्याचे मान्य करत तसे पत्रही नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना दिले.
सावंतवाडी : विद्युत विभागाने जुने नियम दाखवून नगरपालिकेचे विद्युत कर्मचारी काढून घेतले होते. मात्र, या विरोधात नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासह नगरसेवक व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी विद्युत विभागाचे उपविभागीय अभियंता अमोल राजे यांना शुक्रवारी घेराओ घालत जाब विचारताच पुन्हा वीज कर्मचारी पूर्ववत देण्याचे मान्य करत तसे पत्रही नगराध्यक्ष बबन साळगावकर यांना दिले. त्यानंतर हा घेराओ मागे घेण्यात आला.
सावंतवाडी विद्युत विभागाने १९८४ चे नियम दाखवून नगरपालिकेला दिलेले दोन वीज कर्मचारी काढून घेतले होते. नगरपालिका शहरवासीयांना विद्युत सुविधा देत असतात, मात्र विद्युत पोलवर चढण्याचे काम विद्युत विभागाचे कर्मचारी म्हणजेच वायरमनचे असते.
गेले काही दिवस शहराला वायरमनच नसल्याने अनेक पोलवरील ट्युबलाईट बंद होत्या. त्यामुळे नागरिक चांगलेच आक्रमक होत याबाबत सतत पालिका प्रशासनास जाब विचारत असत. त्यामुळे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यासह उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, नगरसेविका अनारोजीन लोबो, शुभांगी सुकी, माधुरी वाडकर, सभापती आनंद नेवगी, मनोज नाईक, बाबू कुडतरकर, माजी नगरसेवक विलास जाधव, शहरप्रमुख शब्बीर मणियार, शुभांगी पारकर, नितीन कारेकर, राजा वाडकर आदींनी मिळून विद्युत विभागाचे उपकार्यकारी अभियंता अमोल राजे यांना घेराओ घालत जाब विचारला. तसेच वीज कर्मचारी प्रथमच काढून घेण्यात आले त्याचे कारण काय, असा सवाल केला.
त्यावर उपविभागीय अभियंता राजे यांनी मार्चची कामे असल्याने हे कर्मचारी काढून घेतले. ते आम्ही पूर्वतत देणार असे सांगितले. मात्र नगराध्यक्ष यांनी यापूर्वी कधीच असे झाले नाही. मग आताच का कर्मचारी काढून घेण्यात आले, असा सवाल केला. त्यावर त्यांच्याकडे काही उत्तर नव्हते.
यावेळी माजी नगरसेवक विलास जाधव तसेच शहरप्रमुख शब्बीर मणियार चांगलेच आक्रमक झाले होते. मात्र, आंदोलनकर्त्यांनी घेतलेले आक्रमक रूप बघून अखेर विद्युत विभागाने तातडीने वीज कर्मचारी पालिकेला देण्यात येतील, असे जाहीर केले. तसेच याबाबतचे लेखी पत्रही पालिकेला दिले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.
आम्हाला आंदोलन करावे लागते हे दुर्दैव : साळगावकर
विद्युत विभागाचा कारभार योग्य नाही. ते पोल आणण्यापासून विजेचा मीटर एखाद्याच्या घरात लागेपर्यंत ग्राहकाला पैशांसाठी सोडत नाहीत. मग आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी काय करायचे, असा सवाल करत आम्हाला आंदोलन करावे लागत असेल तर ते दुर्दैव आहे. पण आम्ही शहराच्या हिताचे असेल त्याला प्राधान्य देऊ, असे मत नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी मांडले.