सिंधुदुर्ग : शस्त्रक्रियेनंतर पियुष रमला '१०० इडियटस्' संगे, आई-वडिलांचे डोळे पाणावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 02:35 PM2018-03-09T14:35:26+5:302018-03-09T14:35:26+5:30
मालवण तालुक्यातील गोळवणच्या पियुषवर मुंबईत यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया काळात आपल्याच कुटुंबातील पियुष एक सदस्य असल्याच्या भावनेतून मालवण येथील '१०० इडियटस्' या सोशल मिडियावरील ग्रुपने लाख मोलाचे योगदान दिले. केवळ आर्थिक मदत करून न थांबता परिस्थितीपुढे हतबल झालेल्या पियुषच्या कुटुंबियांना आधार व धीर दिला.
सिंधुदुर्ग : मालवण तालुक्यातील गोळवणच्या पियुषवर मुंबईत यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया काळात आपल्याच कुटुंबातील पियुष एक सदस्य असल्याच्या भावनेतून मालवण येथील '१०० इडियटस्' या सोशल मिडियावरील ग्रुपने लाख मोलाचे योगदान दिले. केवळ आर्थिक मदत करून न थांबता परिस्थितीपुढे हतबल झालेल्या पियुषच्या कुटुंबियांना आधार व धीर दिला.
पियुष शस्त्रक्रियेतून सावरत असताना पियुषसह त्याच्या आई वडिलांनी '१०० इडियटस्'चे भेट घेऊन आभार मानले. यावेळी '१०० इडियटस्' च्या मित्रपरिवारात रमलेल्या पियुषला पाहून सर्वांचे मन भरून आले.
गोळवण सावरवाडी येथील पियुष यशवंत परब या तीन वर्षाच्या बालकाची जानेवारी महिन्यात मुंबईत यशस्वी शस्त्रक्रिया झाली. पियुषच्या शस्त्रक्रियेसाठी सर्वसामान्य जीवन जगत असल्याने परब कुटुंबीयांनी समाजापुढे पदर पसरला. जिल्ह्यातील काही संस्थांनी आर्थिक मदतीचा हात पुढे केला.
डोक्यात झालेले पाणी शस्त्रक्रियेतून बाहेर काढण्यासाठी सुमारे आठ लाख रुपयांची भर केली गेली. यात आर्थिक मदत करण्यापासून ते परब कुटुंबीयासह पियुषला आधार देण्यापर्यंत १०० इडियटस्'नी माणुसकी जपली. आपल्या अडचणीत कुटुंबातील सदस्याप्रमाणे योगदान देणाऱ्या या ग्रुपचे पियुषच्या आई-वडिलांनी त्यांची मालवणात भेट घेत आभार मानले.
'१०० इडियटस्'नी अवघ्या दहा दिवसांत तब्बल १ लाख ८५ हजार ३७३ रुपये जमा करत त्याचे आजोबा मनोहर यशवंत परब यांच्याकडे ग्रुप एडमीन सिझर डिसोजा यांनी धनादेश सुपूर्द केला. तसेच पियुषच्या कुटुंबांच्या वारंवार संपर्कात राहून शस्त्रक्रियेदिवशी उपस्थित राहून कुटुंबीयांना धीर दिला.
समाजातून लोप पावत चाललेला माणुसकीचा झरा '१०० इडियटस्'नी वाहता ठेवला. त्यांनी समाजाप्रती केलेल्या समाजकार्याची सर्वांनीच दखल घेतली आहे. याच सोशल मिडियावरील ग्रुपच्या माध्यमातून सदस्यांनी वैद्यकीय क्षेत्रात सामाजिक काम करण्याचे ध्येय मनाशी बाळगले आहे.
आई-वडिलांचे डोळे पाणावले
पियुषच्या शस्त्रक्रियेसाठी जमा केलेली आर्थिक मदत त्याच्या आजोबांकडे सुपूर्द करताना शहरातील फोवकांडा पिंपळ येथील महापुरुषाकडे यशस्वी शस्त्रक्रियेसाठी साकडे घालण्यात आले होते. पियुषवर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर तो काहीसा सावरत आहे. त्याच्या आईवडिलांनी '१०० इडियटस'ची मालवणात भेट घेत महापुरुषाचे आशीर्वाद घेतले.
यावेळी '१०० इडियटस्' सोबत पियुष काहीकाळ रमून गेला. प्रत्येक 'इडियटस्' त्याला मायेने गोंजारत होता. पियुषवरील '१०० इडियटस्' चा जीव पाहून त्याच्या आई-वडिलांचे डोळे पाणावले.