सिंधुदुर्ग : आंगणेवाडीतील कृषी प्रदर्शन महाराष्ट्रासाठी उपयुक्त ठरेल: विनायक राऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 04:44 PM2018-01-22T16:44:30+5:302018-01-22T16:49:11+5:30
मालवण तालुक्यातील मसुरे येथील आंगणेवाडी यात्रोत्सवाच्या निमित्ताने राज्य शासनाच्यावतीने मोजक्या दिवसात राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन सोहळ्याचे आयोजन केले आहे. याचे उद्घाटन २६ रोजी दुपारी २ वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.
सिंधुदुर्ग : मालवण तालुक्यातील मसुरे येथील आंगणेवाडी यात्रोत्सवाच्या निमित्ताने राज्य शासनाच्यावतीने मोजक्या दिवसात राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन सोहळ्याचे आयोजन केले आहे. याचे उद्घाटन २६ रोजी दुपारी २ वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.
जिल्ह्यातील शेतकरी व चाकरमान्यांसाठी हे कृषी प्रदर्शन उपयुक्त ठरणार आहे. महाराष्ट्र तसेच गुजरात येथील नामांकित कृषी क्षेत्रातील अग्रेसर कंपन्या प्रदर्शनात सहभागी होत असल्याने हे कृषी प्रदर्शन महाराष्ट्र राज्याला मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला.
आंगणेवाडी येथे २५ ते २९ जानेवारी या कालावधीत होणाऱ्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरातील सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, नागेंद्र परब, तालुकाप्रमुख बबन शिंदे, ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक तथा गटविकास अधिकारी (कुडाळ) विजय चव्हाण, जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजीराव शेळके, आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष नरेश आंगणे, भास्कर आंगणे, कृषी प्रदर्शनाचे आयोजन प्रमुख संदीप गिड्डे, माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर, बाबा सावंत, बंडू चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी हेलिपॅड व्यवस्था व कृषी प्रदर्शन जागेची पाहणी करण्यात आली. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, माजी उपसभापती छोटू ठाकूर उपस्थित होते.
खासदार राऊत म्हणाले, चांदा ते बांदा योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यशासनाने शेतकरी मेळावे घेण्याबाबत तरतूद केली आहे. या योजनेतील पहिला मेळावा चंद्रपूर जिल्ह्यात झाला तर आंगणेवाडी येथे होणारा राज्यातील दुसरा मेळावा आहे.
चांदा ते बांदा या योजनेचा हा योगायोग असला तरी भव्य-दिव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यासाठी आंगणे कुटुंबीय आणि आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाने आमच्या सर्व अडचणी दूर करीत मोक्याच्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली. येथील शेतकºयांना आधुनिक शेतीबरोबरच सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, प्रात्यक्षिके दाखविली जाणार आहेत.
यावेळी कृषी प्रदर्शन सोहळ्याचे प्रमुख संदीप गिड्डे यांनी माहिती दिली. शासनाच्या कृषी विभागाकडून हे प्रदर्शन होत आहे. यात शेतकऱ्यांसाठी शेती व्यवसायातील अद्ययावत तंत्रज्ञान याविषयी प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात येणार असून पशु संवर्धन जागरूकतेसाठी मुक्त गोठा, जलयुक्त शिवार योजनेतील यशोगाथा, पर्यटन क्षेत्रात असलेल्या संधी, शेतकरी अपघात विमा, क्वॉयर बोर्डाच्या उत्पादनाचे विविध डेमो दाखविले जाणार आहेत.
मालवण तालुका पर्यटनाचा केंद्रबिंदू आहे. त्याचप्रमाणे आगामी काळात येथील शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून कृषी क्षेत्रात सिंधुदुर्ग जिल्ह्याला अग्रेसर बनवून मालवण तालुका कृषी क्षेत्रात केंद्रबिंदू बनविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील.
शेतकऱ्यांच्या सकारात्मकतेमुळे काजू, नारळ तसेच भातशेतीचे हेक्टरी उत्पादन वाढले आहे. मुंबईस्थित चाकरमानीवर्गाची बहुतांशी जमीन पडीक राहते. त्यामुळे अशा जमिनी वापरात आणल्यास शेतीला चालना मिळेल, असे आमदार वैभव नाईक म्हणाले.
सिंधु सरस महोत्सवाला वन्स मोअर
कृषी प्रदर्शनाच्या जोडीला सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा सिंधु सरस महोत्सव होत आहे. याआधी मागील महिन्यात कुडाळ येथे हा महोत्सव यशस्वी झाला असून पुन्हा एकदा वन्स मोअर मिळाला आहे.
महोत्सवात कोल्हापूर, रत्नागिरी, ठाणे, पालघर या जिल्ह्यांतील नामांकित ६० बचतगटांना निमंत्रण देण्यात आले आहे. तर विविध मालवणी पदार्थ बनविणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीस बचतगट यात सहभागी होणार आहेत. २५ जानेवारीला या महोत्सवाचा शुभारंभ होणार असून बचतगटांच्या मालालाही भरघोस भाव मिळेल, असा विश्वास सिंधु सरस महोत्सवाचे संयोजक विजय चव्हाण यांनी व्यक्त केला.
महोत्सव व कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असून कृषी विद्यापीठाच्या पुढाकाराने एक हजार रंगबिरंगी फुलझाडांचा फ्लॉवर शोही याचवेळी होणार आहे, असे नाईक यांनी सांगितले.