रोजगारातही सिंधुदुर्ग धरतो गोव्याची कास, अनेक प्रकल्प बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 06:12 PM2020-12-22T18:12:50+5:302020-12-22T18:15:22+5:30
sindhudurg News- सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला तालुक्यांमध्ये रोजगार निर्मितीसाठी प्रकल्प उभारण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात युवकांना रोजगाराची प्रतीक्षा असल्याचे दिसून येत आहे. अनेक प्रकल्प रखडल्याने युवकवर्ग नाराज आहे. त्यामुळे आरोग्याप्रमाणे रोजगारातही सिंधुदुर्गला गोव्याची कास धरावी लागत आहे.
अनंत जाधव
सावंतवाडी : सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला तालुक्यांमध्ये रोजगार निर्मितीसाठी प्रकल्प उभारण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात युवकांना रोजगाराची प्रतीक्षा असल्याचे दिसून येत आहे. अनेक प्रकल्प रखडल्याने युवकवर्ग नाराज आहे. त्यामुळे आरोग्याप्रमाणे रोजगारातही सिंधुदुर्गला गोव्याची कास धरावी लागत आहे.
दोडामार्ग तालुक्यात आडाळी एमआयडीसी, सावंतवाडी तालुक्यात उत्तम स्टील अँड पॉवर प्रकल्प, आरोंदा किरणपाणी पोर्ट, वाफोली चष्मा प्रकल्प आणि अन्य प्रकल्प, सावंतवाडी रेल्वे टर्मिनस, वेंगुर्ला तालुक्यातील रेडी पोर्ट, टाटा मेटॅलिक प्रकल्प बहुचर्चित राहिले. बेकारांना नोकऱ्या देणार असे स्वप्न रंगविले. पण प्रत्यक्षात स्वप्नभंग झाला.
उत्तम स्टील अँड पॉवर प्रकल्पासाठी सुमारे दोन हजार एकर जमीन सातार्डा, सातोसे, मडुरा येथे संपादित केली आहे. तसेच टाटा मेटॅलिक प्रकल्प रेडी येथे सुरू होता. तो बंद झाल्याने तेथेही जमीन पडून आहे. माजी अर्थमंत्री प्रा. मधु दंडवते यांनी रेडी येथे इस्पात कंपनीचा प्रकल्प सुरू केला होता. तो प्रकल्प बंद झाल्यानंतर तेथे टाटा मेटॅलिक प्रकल्प सुरू झाला. त्यामुळे तोही प्रकल्प बंद झाला. तो प्रकल्प सुरू करण्यासाठी बेरोजगार व टाटा मेटॅलिकमध्ये नोकरी असणाऱ्या लोकांनी सतत प्रयत्न केले. मात्र, प्रकल्प होऊ शकला नाही.
रेडी समुद्राच्या जवळ टाटा मेटॅलिक प्रकल्प होता. गोवा, तेरेखोल किल्ला जवळ असणाऱ्या या प्रकल्पामुळे रोजगार निर्माण होत होता. तसेच रेडी, शिरोडा, आरोंदा भागांमध्ये अप्रत्यक्ष व्यवसाय व रोजगाराची दालने खुली झाली होती. मात्र, बंद झालेला प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी आश्वासनापलीकडे फक्त राजकीय चर्चा झाली.
रेडी पोर्ट या सुमारे पाच हजार कोटींच्या ह्यबांधा वापरा आणि हस्तांतरित कराह्ण प्रकल्पाची घोषणा झाली. रेडी पोर्ट खासगी विकासकाकडे हस्तांतरित करण्यात आले. त्यानंतर या विकासकांनी याठिकाणी काय विकास केला व किती लोकांना रोजगार दिला, याचा लेखाजोखा मांडला गेला पाहिजे. प्रत्यक्षात रेडी पोर्ट विकसित झाले नाही. मात्र, शासनाचे मेरिटाईम बोर्ड रेडी पोर्ट खनिज वाहतूक करण्यासाठी चालवित होते. ते खासगी विकासकाकडे गेल्याने निर्यात फायदा झाला.
रोजगार निर्माण करणारे प्रकल्पच उभे राहिले नाहीत
बांदा, वाफोली याठिकाणी खासगी कंपनीच्या माध्यमातून चष्मा प्रकल्प आणि अन्य प्रकल्प उभे राहणार होते. मात्र, तेही उभे राहू शकले नाहीत. या प्रकल्पांच्या घोषणा आणि चर्चा झाल्या. सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यांमधील नमूद केलेले प्रकल्प उभे राहिले असते तर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार होता. मात्र, घोषणाबाजी करून जमिनी संपादित केल्या. प्रत्यक्षात रोजगार निर्माण करणारे प्रकल्प उभे राहिले नाहीत. त्यामुळे तरुणवर्गाला गोवा, मुंबई व अन्य ठिकाणी जावे लागत आहे.
जनतेच्या पदरी उपेक्षाच
सिंधुदुर्गाने महाराष्ट्रालाच नाही तर देशाला अनेक नेते दिले. मात्र, येथील जनतेच्या पदरात उपेक्षाच आहे. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, दीपक केसरकर, प्रवीण भोसले असे एकापेक्षा एक नेते सध्या कार्यरत आहेत.