सिंधुदुर्ग : शहीद जवानाची अमर कहाणी, चौकुळमधील सैनिकाचा तीस वर्षांनंतर उलगडला इतिहास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 11:57 AM2018-03-05T11:57:20+5:302018-03-05T11:57:20+5:30
आंबोलीपासून १० किलोमीटर अंतरावरील सुंदर, निसर्गसंपन्न अशा चौकुळ गावाची ओळख सैनिकांचे गाव म्हणूनही आहे. देशसेवा बजावताना काही सैनिकांना गंभीर दुखापती झाल्या, तर काही शहीदही झाले. अशाच एका वीर सैनिकाला शहीद होऊन ४ मार्चला तीस वर्षे पूर्ण होत आहेत. रामचंद्र सोमा गावडे (चौकुळ-केगदवाडी) असे या शहीद सैनिकाचे नाव असून, त्यांची ही अमर कहाणी.
महादेव भिसे
आंबोली : आंबोलीपासून १० किलोमीटर अंतरावरील सुंदर, निसर्गसंपन्न अशा चौकुळ गावाची ओळख सैनिकांचे गाव म्हणूनही आहे. गावातील पन्नास टक्के लोक आज सैन्यामध्ये आहेत. गेली ९० वर्षे येथील लोक भारतीय सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करीत आहेत. देशसेवा बजावताना काही सैनिकांना गंभीर दुखापती झाल्या, तर काही शहीदही झाले. अशाच एका वीर सैनिकाला शहीद होऊन ४ मार्चला तीस वर्षे पूर्ण होत आहेत. रामचंद्र सोमा गावडे (चौकुळ-केगदवाडी) असे या शहीद सैनिकाचे नाव असून, त्यांची ही अमर कहाणी.
चौकुळ-केगदवाडी म्हणजे अतिशय दुर्गम भाग. ज्या भागात त्याकाळी वाहन सोडाच, चालत जाणेसुद्धा कठीण होते. चौकुळ ते केगदवाडी हे अंतर जवळपास पाच किलोमीटरचे आहे. या दरम्यान आपल्याला यायचे-जायचे असल्यास त्या काळी पायीच जावे लागत असे. घनदाट जंगलातून येत-जात असताना अस्वल, वाघ, बिबट्या यांसारख्या श्वापदांची भीती होती. त्यावरही मात करीत त्या काळी, म्हणजे सन १९५५-५६ च्या दरम्यान रामचंद्र गावडे यांनी तिसरीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर मोलमजुरी, शेती यावर आपली उपजीविका चालविली.
शहीद जवान रामचंद्र गावडेच्या पत्नी सीता गावडे
रामचंद्र गावडे यांची घरची परिस्थिती बेताची होती. मिरची-भाकरी किंवा काळे मीठ आणि भाकरी खाऊन त्यांचे कुटुंब राहत होते. एक भाऊ आणि सहा बहिणी असा त्यांचा भला मोठा परिवार होता. त्या सगळ्यांची उपजीविका चालविण्याची मुख्य जबाबदारी रामचंद्र यांच्यावरच होती. याशिवाय पत्नी आणि तीन मुले. पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा गावडे यांचा परिवार. त्यांच्या पत्नी सीता गावडे यांनी या दुर्गम भागात अतिशय हालअपेष्टा सोसून आपल्या तीन मुलांचे पालनपोषणही व्यवस्थित केले.
१९८८ साली श्रीलंका येथे शांती सेनेसोबत कर्तव्य बजावत असताना एका स्फोटामध्ये ते शहीद झाले. हा स्फोट इतका भयंकर होता की, त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव सुद्धा भारतात आणता आले नाही किंवा त्यांच्या कुटुंबालाही त्यांचे अंत्यदर्शन घेता आले नाही.
ही बातमी त्यांच्या कुटुंबाला कळताच सीता गावडे यांच्यावर आभाळच कोसळले. सुनील, शिल्पा व लहानगी शितल या दोन ते आठ वर्षे वयोगटातील लहान मुलांचे काय होणार, या चिंतेने त्या स्तब्ध झाल्या. मात्र या कठीण परिस्थितीवरही त्यांनी हिमतीने मात केली. तिन्ही मुलांना चांगले शिक्षण देत स्वत:च्या पायावर उभे केले आणि वीर सैनिकाची पत्नीही वीर असते याची प्रचितीच जणू जगाला दिली.
४ मार्च रोजी रामचंद्र गावडे या वीर शहीद जवानाच्या बलिदानाला तीस वर्षे पूर्ण होत आहेत. चौकुळ गावाला रामचंद्र्र गावडे आणि त्यांच्यासारख्या अनेक शहीद जवानांनी पवित्र केले आहे. त्यांचे हे बलिदान हा समाज अखंड लक्षात ठेवेल. वीर शहीद जवान रामचंद्र्र गावडे यांना मानाचा मुजरा!
१९७४ साली सैन्यात भरती
त्याकाळी चौकुळ गावातील बहुतांश लोक बेळगाव येथे कामाला जात असत. वयाच्या अठराव्या वर्षी रामचंद्र गावडे हेही बेळगाव येथे कामानिमित्त (हॉटेलमध्ये) गेले. त्याकाळी सैन्यात भरती होण्यासाठी शिक्षणाची कोणतीही अट नसल्याने आपले नशीब आजमावण्यासाठी त्यांनीही सैनिक भरती प्रक्रियेत सहभाग घेतला आणि लगेच सैन्यात भरतीही झाले. १९७४ साली ते सैन्यात भरती झाले. त्यानंतर १९७९ मध्ये त्यांचा विवाह सीता गावडे यांच्याशी झाला.
सीता गावडे यांनी परिवार सांभाळला
रामचंद्र गावडे यांची घरची परिस्थिती बेताची होती. त्यांचा भला मोठा परिवार होता. त्यांच्या पत्नी सीता गावडे यांनी या दुर्गम भागात अतिशय हालअपेष्टा सोसून आपल्या तीन मुलांचे पालनपोषणही व्यवस्थित केले.