सिंधुदुर्ग : कसालमध्ये बॉक्सवेल ब्रिजची व्यवस्था करावी, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापनाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 03:57 PM2018-05-31T15:57:15+5:302018-05-31T15:57:15+5:30
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या जोरात सुरू आहे. मात्र याच महामार्गावरील न्यू इंग्लिश स्कूल कसाल या प्रशालेचीही जमीन गेली आहे. त्यामुळे आता विद्यार्थी या शाळेतून बाहेर पडल्यावर थेट महामार्गावर येणार आहेत.
सिंधुदुर्गनगरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या जोरात सुरू आहे. मात्र याच महामार्गावरील न्यू इंग्लिश स्कूल कसाल या प्रशालेचीही जमीन गेली आहे. त्यामुळे आता विद्यार्थी या शाळेतून बाहेर पडल्यावर थेट महामार्गावर येणार आहेत.
त्यांच्यासाठी महामार्ग प्राधीकरणने कोणतीच व्यवस्था ठेवलेली नाही. त्यामुळे भविष्यात या ठिकाणी गंभीर प्रकारचे अपघात होण्याची शक्यता आहे. तरी या ठिकाणी बॉक्सवेल ब्रिजची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी कसाल हायस्कूलच्या पालक, ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापनाने जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की, कसाल गाव हे मुंबई-गोवा या महामार्गावर असून न्यू इंग्लिश स्कूल ही शाळा या महामार्गाला लागून आहे. या महामार्गाच्या चौपदरीकरणात या शाळेची जमीनही गेली आहे. त्यामुळे आता मुले शाळेच्या गेटमधून बाहेर पडल्यावर थेट रस्त्यावर येणार आहेत.
एवढ्या रस्त्यावर असलेल्या आमच्या शाळेतील मुलांचा महामार्ग प्राधीकरणाने जराही विचार केलेला नसून हा रस्ता पार करण्यासाठी कोणतीही उपाययोजना केलेली नाही. ही बाब खूप गंभीर आहे. महामार्गालगत लागून असलेल्या सर्व हायस्कूलना रस्ता पार करण्यासाठी बॉक्सवेल ब्रिजची व्यवस्था करण्यात आली आहे.
मात्र कसालमध्ये याबाबत कोणतीच खबरदारी घेतलेली दिसत नाही. याबाबत महामार्ग अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता रेल्वे ब्रिजमुळे या ठिकाणी बॉक्सवेल ब्रिज होऊ शकत नाही असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु खरी परिस्थिती पहाता हायस्कूल आणि रेल्वे ब्रिज यांच्यात खूप मोठे अंतर आहे. त्यामुळे आपण स्वत: लक्ष घालून या शाळेतील मुलांसाठी बॉक्सवेल ब्रिजची व्यवस्था करावी.
जर या ठिकाणी मुलांसाठी व्यवस्था केली नाही तर वारंवार अपघात होण्याची शक्यता आहे. यात एखाद्या मुलाला आपला प्राणही गमावण्याची भीती आहे. याबाबत कोणतीच व्यवस्था न झाल्यास सर्व पालक, विद्यार्थी मिळून आंदोलन केले जाईल असा इशाराही दिला आहे. यावेळी कसाल हायस्कूल संस्थेचे अवधूत मालणकर, प्रभाकर सावंत, उपसरपंच दत्तात्रय सावंत आदी उपस्थित होते.