सिंधुदुर्ग : अॅट्रॉसिटी कायदा अधिक कडक करावा, कुडाळात मोर्चा, घोषणांनी शहर दणाणले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 03:41 PM2018-04-11T15:41:20+5:302018-04-11T15:41:20+5:30
अॅट्रॉसिटी कायदा अधिक कडक करा, मनोहर उर्फ संभाजी भिडे यांना तत्काळ अटक करा या व इतर मागण्यांसाठी कुडाळ तालुका मागासवर्गीय अन्याय, अत्याचार विरोधी कृती समितीच्यावतीने कुडाळ प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
सिंधुदुर्ग : अॅट्रॉसिटी कायदा अधिक कडक करा, मनोहर उर्फ संभाजी भिडे यांना तत्काळ अटक करा या व इतर मागण्यांसाठी कुडाळ तालुका मागासवर्गीय अन्याय, अत्याचार विरोधी कृती समितीच्यावतीने कुडाळ प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी देण्यात आलेल्या घोषणांनी कुडाळ शहर परिसर दणाणून गेला. सरकारने मागण्या मान्य न केल्यास जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कृती समितीचे अध्यक्ष सत्यवान साठे यांनी यावेळी दिला.
अध्यक्ष सत्यवान साठे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरुवात कुडाळ शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून करण्यात आली. तेथून हा मोर्चा गांधी चौक, कुडाळ जिजामाता चौक, पोस्ट कार्यालय, संत राऊळ महाराज कॉलेज चौक यामार्गे कुडाळ प्रांत कार्यालयावर धडकला.
मोर्चा प्रांत कार्यालयावर धडकल्यानंतर समितीचे अध्यक्ष सत्यवान साठे, उपाध्यक्ष विष्णू तेंडोलकर, सचिव चंद्रकांत वालावलकर, बापू कुडाळकर, अमोल पावसकर, दिनेश जाधव, वामन बांबर्डेकर, स्मिता नाईक, आनंद नेरूरकर, विष्णू जाधव, प्रतिभा सावळे, लक्ष्मण पवार, सत्यवान तेंडुलकर, पर्णवी जाधव, दीपा पिंगुळकर यांच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी डॉ. विकास सूर्यवंशी यांची भेट घेत त्यांना मागण्यांचे निवेदन दिले व आपल्या मागण्या शासन आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्याची विनंती केली.
...या आहेत मागण्या
निवेदनात समितीच्यावतीने नमूद करण्यात आले आहे की, २० मार्च रोजीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अॅट्रॉसिटी कायद्याबाबतच्या निर्णयाची अंमलबजावणी शासनाने करू नये. अॅट्रॉसिटी कायद्यात कोणताही बदल न करता हा कायदा अधिक कडक करावा. जेणेकरून दलितांवरील अन्याय, अत्याचार कमी होईल.
कोरेगाव-भीमा हल्ल्यातील मुख्य सूत्रधार मनोहर उर्फ संभाजी भिडे यांना तत्काळ अटक करण्यात यावी, खेड जिजामाता उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना तत्काळ अटक करा, कोरेगाव-भीमा दंगलीदरम्यान बहुजन समाजातील बांधवांवर झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, शैक्षणिक शिष्यवृत्तीत कपात करण्यात येऊ नये अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.