सिंधुदुर्ग : राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न : वैभव नाईक यांची टीका, नीतेश राणेना प्रत्युत्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 04:18 PM2018-03-06T16:18:59+5:302018-03-06T16:18:59+5:30
सिंधुदुर्गात पहिल्यांदाच राजकीय लाभासाठी आमदार नीतेश राणे यांनी शिवजयंती साजरी केली आहे. शिवसेनेकडून गेली अनेक वर्षे अक्षय्यतृतीया व तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जात आहे. या शिवजयंतीच्या निमित्ताने टीका करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर हा तर राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न आहे, असा टोला शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी लगावला आहे.
कणकवली : सिंधुदुर्गात पहिल्यांदाच राजकीय लाभासाठी आमदार नीतेश राणे यांनी शिवजयंती साजरी केली आहे. शिवसेनेकडून गेली अनेक वर्षे अक्षय्यतृतीया व तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जात आहे. या शिवजयंतीच्या निमित्ताने टीका करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर हा तर राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न आहे, असा टोला शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी लगावला आहे.
वैभव नाईक पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांना ३२ टक्के मराठा समाजापुरते मर्यादित करून एकप्रकारे नीतेश राणे यांनी अनेक शिवप्रेमींचा अपमानच केला आहे. त्यामुळे नीतेश राणे यांनी पहिल्यांदा शिवप्रेमींची माफी मागावी. तसेच त्यांनी माझ्यावर दहशतवादाचे आरोप करणे हे हास्यास्पद आहे. नीतेश राणे यांच्या सततच्या राजकीय चमकेगिरीमुळे मराठा क्रांती मूक मोर्चा समन्वय समितीतून त्यांना बाजूला ठेवण्यात आले.
आपल्या फायद्यासाठी भाजपाकडे पायघड्या घालणाऱ्या नीतेश राणे यांनी ज्यावेळी भाजप उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढले त्यावेळी त्यांचा साधा निषेधही केला नाही. छत्रपती शिवाजी महाराज बहुजनांचे होते. जाती-धर्मापलीकडे जाऊन त्यांनी काम केले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना विशिष्ट समाजापुरते मर्यादित करून अनेक शिवप्रेमींचा अपमान खºया अर्थाने नीतेश राणे यांनीच केला आहे.
वेंगुर्लेचा राडा, गोव्यातील तोडफोडीचे प्रकरण, चिंटू शेख गोळीबार प्रकरण, मुंबईतील हॉटेल मालकाकडे खंडणी मागण्याचे प्रकरण, कणकवली शहरातील गाड्या जाळण्याचे प्रकरण या सगळ्या प्रकरणांची पाळेमुळे नीतेश राणेंपर्यंत जात आहेत, असा आरोप वैभव नाईक यांनी करतानाच मुंबईतील केसवाणी प्रकरणाचा अहवाल विधानसभा अध्यक्षांकडे आलेला आहे, असेही सांगितले.
आमदार नाईक पुढे म्हणाले, विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणाबाबत बोलण्यास परवानगी दिल्यास खरी माहिती मी जनतेसमोर आणणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने खंडणीखोर कोण आहेत हे जनतेसमोर येईल. ५० लाखांच्या रोख रकमेबाबत यापूर्वी सभागृहात नीतेश राणे यांनी आवाज उठविला होता. मात्र त्यावेळी त्यांच्याकडे कोणताही पुरावा नव्हता. त्यामुळे अखेर त्यांना सभागृहाची माफी मागावी लागली होती, याचा विचार आधी त्यांनी करावा. ज्या आॅडिओ क्लिपबाबत आमदार नीतेश राणे बोलत आहेत त्याबाबत त्यांनी सभागृहात आवाज उठविण्यापूर्वी आधी वडिलांचा सल्ला घ्यावा व त्यानंतरच कृती करावी, असा टोलाही आमदार वैभव नाईक यांनी यावेळी नीतेश राणे यांना लगावला.
बदनामी करणाऱ्यांना यश मिळणार नाही
माझ्या विरोधी कुठलाही पुरावा नसताना माझी बदनामी करण्याच्या दृष्टीने कणकवली शासकीय विश्रामगृहातील कर्मचाऱ्यांला मारहाण केल्याचे निराधार वृत्त प्रसिद्ध करणाऱ्या संबंधितांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच विनाकारण चुकीच्या गोष्टीचे भांडवल करून माझी नाहक बदनामी करण्यात येत आहे. मात्र यात त्यांना यश येणार नाही. कारण येथील जनता सुज्ञ आहे, असे आमदार नाईक यावेळी म्हणाले.