सिंधुदुर्ग : रासायनिक शेती हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करणार : सुधीर सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 02:23 PM2018-10-19T14:23:19+5:302018-10-19T14:26:41+5:30
सध्याच्या वाढत्या रासायनिक शेतीमुळे विषारी अन्न निर्माण होत असून मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. लोकांना विषमुक्त अन्न मिळून जिल्ह्यातील रासायनिक शेती हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सिंधुदुर्गनगरी : सध्याच्या वाढत्या रासायनिक शेतीमुळे विषारी अन्न निर्माण होत असून मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. लोकांना विषमुक्त अन्न मिळून जिल्ह्यातील रासायनिक शेती हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
नैसर्गिक शेतीचे प्रणेते पद्मश्री डॉ. सुभाष पाळेकर यांची ३० व ३१ आॅक्टोबर रोजी आंबा, काजू, नारळ, कोकम व भाजीपाला या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी कोकणातील तसेच कोल्हापूर येथून शेकडो शेतकरी उपस्थित राहणार आहेत. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शेतकरी व बागायतदारांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही सावंत यांनी केले आहे.
नैसर्गिक शेती परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. याची माहिती देण्यासाठी ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी ओरोस येथील छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी सचिव दिनानाथ वेरणेकर, उन्मेश बागवे, सुप्रिया निकम, मंदार गीते, विलास सावंत, आशिष पाटील, रेखा खांडेकर, शिरोडकर आदी उपस्थित होते.
यावेळी सुधीर सावंत म्हणाले, शेतकऱ्यांचे जीवन आनंदी आणि समृद्ध करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान उत्तम काम करीत आहे. कृषी संशोधन, शिक्षण, विस्तार व सल्ला सेवा या क्षेत्रात गेली २० वर्षे ही संस्था कार्यरत आहे. दिवसेंदिवस बदलत्या हवामानाचा शेती उद्योगावर मोठा परिणाम होताना दिसून येत आहे.
असंतुलित रासायनिक खते व कीटकनाशके यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे विषारी अन्न निर्माण होत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न भेडसावत आहे. जमिनीचे आरोग्यही बिघडत चालले असून पिकांच्या उत्पादनात घट होताना दिसून येत आहे.
स्वावलंबी ग्रामस्वराज्य मोहीम हाती
सध्याच्या शेतीत रासायनिक खतांचा वाढता वापर आहे. हा वाढता वापर आरोग्यास हानिकारक ठरत आहे. परिणामी कर्करोग, मधुमेह, हृदयविकार यासारखे असंख्य आजार यामुळे होत आहेत. या सर्व आजारांना पळवून लावण्यासाठी नैसर्गिक शेती हा एकमेव पर्याय असून त्यासाठी आपण झोकून देऊन काम करणार आहोत.
भविष्यात रसायनिक शेती जिल्ह्यातून हद्दपार करणार. नैसर्गिक शेतीचे खूप फायदे आहेत. नैसर्गिक शेतीमुळे आयुर्मान उंचावते, जमीन सुपीक बनते, खर्च कमी व उत्पादन जास्त मिळते. सध्याच्या सरकारने शेती नाकारत औद्योगिकतेवर जास्त भर दिल्याचे दिसून येत आहे. म्हणून शेती व शेतीमालावर प्रक्रिया हा केंद्रबिंदू ठेवून स्वावलंबी ग्रामस्वराज्य या तत्त्वावर भारताची ग्रामीण अर्थव्यवस्था उभी करण्याची मोहीम हाती घेतली आहे, असेही सुधीर सावंत म्हणाले.